नवी दिल्ली - कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे देशातील रेल्वेसेवा ठप्प पडलेली आहे. याचा थेट फटका रेल्वेच्या महसुलाला बसणार आहे. चालू वर्षात रेल्वेचे प्रवासी वाहतुकीद्वारे मिळणारे उत्पन्न ३० ते ३५ हजार कोटी रुपयांनी घटणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेला प्रवासी वाहतुकीद्वारे केवळ १० ते १५ टक्के इतकेच उत्पन्न मिळेल, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोदकुमार यादव यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोरोनाचे वाढते संक्रमण पाहून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने रेल्वेसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा प्रकोप थांबलेला नसल्याने अद्यापपर्यंत प्रवासी रेल्वेसेवा बंदच आहे. अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करु इच्छिणार्या प्रवाशांसाठी गेल्या मे महिन्यापासून विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. या गाड्यांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. सध्या २३० स्पेशल गाड्या चालविल्या जात आहे. स्पेशल गाड्यांमध्ये एकूण जागांच्या तुलनेत ७५ टक्के जागाच आरक्षित होत असल्याने हेही नुकसान रेल्वेला सोसावे लागत असल्याचे यादव यांनी नमूद केले.
मे, जून हे दोन महिने आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात रेल्वेने स्थलांतरित मजुरांची वाहतूक करण्यासाठी विशेष श्रमिक गाड्या चालविल्या होत्या. मजुरांना तिकीट दरात मोठी सवलत दिल्याने याच्या उत्पन्नापासूनही रेल्वेला मुकावे लागले होते. आगामी काळात परिस्थिती कशी राहील, हे आम्ही सांगू शकत नाही. जोवर रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा पूर्ववत होणार नाही, तोवर नुकसान सहन करावे लागेल, असे यादव यांनी सांगितले. रेल्वेने वर्ष २०२० मध्ये मालवाहतुकीचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Post a Comment