माळीवाडा तरुण मंडळाच्या वतीने दहीहंडी ‘नारीशक्तीची’ भव्य देखावा साकार
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक भान देणारा सण आहे. महिलांच्या सहभागाविना कोणताही उपक्रम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मंडळाने घेतलेली ही कल्पना अत्यंत प्रेरणादायी आहे. तरुणाईने सामाजिक बदलासाठी एकत्र आले पाहिजे, हीच खरी समाजसेवा आहे. आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, राजकारण या सर्वच आघाड्यांवर महिलांनी लौकिक कमावला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रीशक्ती ही एक अनिवार्य ताकद आहे. माळीवाडा तरुण मंडळाने महिलांना केंद्रस्थानी ठेवून जो उपक्रम राबवला आहे, तो इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जनसंपर्क साधणारे माळीवाडा तरुण मंडळ यंदा आपल्या ३५ मूर्तींच्या भव्य देखाव्यासह आगळावेगळा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहे. या वर्षीचा प्रमुख देखावा "दहीहंडी नारीशक्तीची" हा असून त्याचे उद्घाटन अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश खरपुडे, माजी नगरसेवक अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधात, मंडळाचे उपाध्यक्ष मयुर भापकर, पैलवान गणपतराव चेडे, खजिनदार आशिष खंदारे ,विष्णुपंत म्हस्के ,विनायक वडे ,शुभम भापकर ,श्रीकांत आंबेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माळीवाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष निलेश खरपुडे यांनी प्रास्ताविक करून मंडळाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. "माळीवाडा तरुण मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक जाणीव जागवणारे उपक्रम हाती घेतले आहेत. समाजात स्त्री-पुरुष समानतेचा विचार रुजविण्यासाठी यंदा दहीहंडीचा देखावा ‘नारीशक्तीची’ साकारला आहे. महिलांनी सर्व क्षेत्रात कर्तृत्व दाखवले असून त्यांचे योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही," असे मत त्यांनी व्यक्त केले.
या देखाव्यातील मुख्य आकर्षण म्हणजे ३५ मूर्तींच्या माध्यमातून महिलांच्या विविध भूमिकांचे दर्शन घडविण्यात आले आहे. या मूर्तींमधून महिलांचे पराक्रम, त्याग, कर्तृत्व आणि सामर्थ्य जिवंत झाले असून, ‘नारीशक्ती’चे सामर्थ्य समाजापुढे उभे करण्यात आले आहे. पारंपरिक दहीहंडीचा देखावा यंदा महिलांच्या रूपातून सादर केल्याने प्रेक्षक भारावून गेले.
प्रास्तविक मयूर भापकर यांनी केले तर आभार आशिष खंदारे यांनी मानले.

Post a Comment