भिंगार शहरामधील तो परिसर कन्टेन्मेंट


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- तब्बल तीन महिन्यानंतर भिंगार शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील लोहारगल्ली, मुळे गल्ली, गवळीवाडा याभागात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर कन्टेन्मेंट झोन तर छावणी क्षेत्रातील सदर बाजार व भिंगार हे परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी मंगळवारी (दि.31) सायंकाळी याबाबतचे आदेश काढले आहेत. भिंगार शहरातील कन्टेन्मेंट व बफर झोन दि.14 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे.

नगर जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून भिंगार छावणी परिषदेने खबरदारीच्या उपाययोजना केल्यामुळे तब्बल तीन महिने कोरोनाचा शिरकाव भिंगारमध्ये झालेला नव्हता मात्र गेल्या दोन दिवसात भिंगार शहरातील लोहारगल्ली, मुळे गल्ली व गवळीवाडा परिसरात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातून कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने हा परिसर कन्टेन्मेंट झोन करण्यात आला आहे तर सदर बाजार व उर्वरित भिंगार शहर हे बफर झोन घोषित करण्यात आले आहे. या परिसरात नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करण्यात आले आहे. तसेच कन्टेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व अस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा इत्यादी 14 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत बंद राहणार आहे. तसेच बफर झोन मधील अत्यावश्यक सेवा (दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे, दवाखाना, राष्ट्रीयकृत बँका तसेच नागरी तथा सहकारी बॅका) वगळून इतर सर्व अस्थापना बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान, वाहनांची ये-जा (नगरपाथर्डी महामार्ग वगळून प्रतिबंधीत) करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post