मर्यादेपेक्षा जास्त सोने होऊ शकते जप्त



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - आयकर नियमानुसार, उत्पन्नाच्या वैध पुराव्याशिवाय मर्यादित सोन्यापेक्षा जास्त सोने जप्त केले जाऊ शकते.

सोन्याच्या दागिन्यांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. भारतात मोठ्या प्रमाणात सोने आयात केले जाते. मात्र लॉकडाऊन कालावधीत सोने खरेदी-विक्री घटल्याने देशाच्या चालू खात्यातील तूट कमी झाली आहे. देशामध्ये अनेक लोक दागिने किंवा बिस्किटांच्या रूपात सोने खरेदी करतात. परंतु आयकर नियमानुसार एका ठराविक मर्यादेपर्यंत सोने घरात ठेवता येते.

सोने खरेदीचा स्रोत वैध असेल व त्याचा पुरावा असेल, तर कितीही मर्यादेपर्यंत सोने घरामध्ये ठेवता येऊ शकते. वैध स्रोत नसल्यास ठराविक मर्यादेपर्यंतच घरात सोने ठेवता येईल. असे सोने घरात ठेवण्यासाठी काही नियम आहेत.

नियमांनुसार, विवाहित महिला 500 ग्रॅम, अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुष 100 ग्रॅम सोने उत्पन्नाचा पुरावा दाखवल्याशिवाय ठेवू शकतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाच्या मते जर कोणत्याही व्यक्तीकडे वारशाने मिळालेल्या सोन्यासह उपलब्ध सोन्याचा वैध स्रोत आहे आणि तो त्याचे प्रमाण देऊ शकतो तर तो कितीही सोने त्याच्याकडे ठेवू शकतो. उत्पन्नाच्या वैध पुराव्याशिवाय मर्यादित सोन्यापेक्षा जास्त सोने जप्त केले जाऊ शकते. आयकर नियमांनुसार, भेट म्हणून मिळालेले 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे दागिनेकिंवा वारसा हक्काने मिळालेल्या दागिन्यांवर कर द्यावा लागत नाही, मात्र ते तुम्हाला वारसा हक्काने मिळाले असल्याचे सिद्ध करावे लागते.

वारसा हक्काने मिळाले आहे तर त्याला ते देणार्‍या व्यक्तीच्या नावाची पावतीसह अन्य माहिती द्यावी लागेल. त्याचप्रमाणे वारसा हक्काने सोने मिळाले असल्यास कौटुंबिक कराराप्रमाणे किंवा सोने भेट म्हणून देण्यात आल्याचे करारपत्र पुराव्यासाठी द्यावे लागेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post