करोनाविरुध्द लढण्यासाठी रेल्वेने बदलली ‘रणनीती’




माय अहमदनगर वेब टीम
नाशिक -रेल्वे कर्मचार्‍यांना करोनाचा धोका टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रणनीती बदलली आहे. भुसावळ मंडळात तिकीट तपासणीसांना (टिसी) फेस शिल्ड व काचेचे भिंग देण्यात आले आहे. आरक्षण कार्यालयात टू वे माईक सिस्टिम लावली असून अल्ट्रा वाईलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीनही लावण्यात आली आहेत. नाशिकरोड स्थानकातही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे.

स्टेशनमास्तर आर. के. कुठार, वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडच्या कार्यालयात दोन माईक सिस्टिम आणि दोन नोट मशिन्स लावण्यात आली आहेत. देवळालीत एक-एक मशिन लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. नेहमीच्या गाड्या बंद असल्या तरी सध्या विशेष प्रवासी रेल्वेगाड्या सुरु आहेत.

आधुनिक नोट मशिन

नोटांचा व्यवहार आरक्षण कार्यालयात जास्त प्रमाणात होत असल्यामुळे भुसावळ मंडळातील सर्व आरक्षण कार्यालयांमध्ये सुरक्षेसाठी अल्ट्रा वाईलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन लावण्यात आली आहेत. आरक्षण लिपिक आणि प्रवाशी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मशीन लावण्यात आली आहेत. नोटांची देवाणघेवाण करताना याचा चांगला उपयोग होणार आहे.

फेस शिल्ड, भिंग

नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोळा टिसी आहेत. त्यांना फेस शिल्डही देण्यात आले आहेत. टिसींना आपले काम करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. गाडीमध्ये बसलेल्या तसेच स्थानकात आलेल्या प्रवाशांचे तिकीट जवळून तपासावे लागते. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे रेल्वेने भुसावळ मंडळ मधील सर्व टिसींना सुरक्षेच्या दृष्टीने फेस शिल्ड आणि भिंग काच दिली आहे. यामुळे कर्मचार्‍यांचे आरोग्य चांगले राखता येईल आणि प्रवाशांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करता येईल.

टू वे माईक

रेल्वे तिकीटाचे आरक्षण करण्यासाठी येणा-या प्रवाशांशी सुसंवादासाठी नाशिकरोडसह भुसावल मंडलमधील सर्व आरक्षण केंद्रांच्या खिडकीवर टू वे माइकची सोय रेल्वेने केली आहे. प्रवासी आरक्षणासाठी केंद्रावर येत असतात. ते रांगेत असताना त्यांना तसेच आरक्षण कर्मचार्‍यांनाही फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करून संवाद साधावा लागतो. त्यामुळे अडचणी येतात. ते लक्षात घेऊन रेल्वेने सर्व आरक्षण खिडक्यांवर टू वे माईक सिस्टमची सोय केली आहे. या माध्यमातून रेल्वे आरक्षण कर्मचारी प्रवाशांचे बोलणे व्यवस्थित समजून घेऊ शकतात. आरक्षण खिडक्यांवर बाहेरील बाजूस प्रवाशांचे बोलणे ऐकून घेण्यासाठी स्पीकर लावण्यात आले आहे.

एक लाख टन कांदा बंगालला रवाना

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांगलादेशला एक लाख टन कांदा निर्यात करण्यात आला. मे आणि जूनमध्ये ४१ मालगाड्यांव्दारे हा कांदा पाठविण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. नाशिकरोड स्थानकाच्या इतिहासात प्रथमच बांगलादेशला कांदा निर्यात झाली. भुसावळ विभागातून बांगलादेशला कांदा निर्यात करण्यात आला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा फायदा झाला. भुसावळ विभागातील मनमाड, लासलगांव, निफाड, खैरवाड़ी, नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्क्यावरुन हा एक लाख टन कांदा निर्यात करण्यात आला.

नाशिकरोडचे वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, मालधक्का प्रमुख ए.एल. पटेल यांनी यासाठी प्रयत्न केले. कांदा निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाली. ६ मे २०२० रोजी पहिली मालगाडी कांदा घेऊन लासलगांव स्थानकातून बांगलादेशला रवाना करण्यात आली. भुसावळ मंडळ विभागातून आतापर्यंत ४१ मालगाड्या बांगलादेशला पाठविण्यात आल्या. कांदा निर्यातीत मनमाडने आघाडी घेतली.

मनमाडहून अकरा मालगाड्या, नाशिकरोड स्थानकातून सात, खेरवाडीहून आठ, निफाडहून दहा, लासलगांवहून पाच मालगाड्या रवाना करण्यात आल्या. एका मालगाडीला चाळीवर डबे असतात. वाणिज्य आणि ऑपरेटिंग विभागाने विशेष नियोजन केले. बांगलादेशला कांदा पाठविण्यासाठी लोडर्ससोबत विडियो कॉन्फरन्सव्दारे बैठका घेतल्या. यामुळे बांगलादेशातील दरशना, बेनापोल आणि रोहनपुर स्थानकात कांद्याची निर्यात सुरु झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post