‘तंत्रशिक्षण ’अध्यापन प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून


माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - एआयसीटीईने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे सुधारित शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले असून येत्या १५ सप्टेंबरपासून अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तर प्रवेशासाठीची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे.

व्यवस्थापन, वास्तुकला, अभियांत्रिकी, औषधनिर्माण आदी विद्याशाखांचा समावेश तंत्रशिक्षणात होतो. त्यावर एआयसीटीईचे नियंत्रण असते. एआयसीटीईने यापूर्वी जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ सप्टेंबरपासून होणार होती. मात्र करोना संसर्गानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.

यानुसार शैक्षणिक वर्ष १५ सप्टेंबरपासून सुरू होईल. विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या निर्णयातून पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन पदविका (पीजीडीए) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे.

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १५ जुलैपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या अभ्यासक्रमाला नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट २०२० ते १ जुलै २०२१ असे राहणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम तारीख १० ऑगस्ट आहे.

दरम्यान, तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यात होणारी सीईटी करोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ती कधी होईल याबाबतही काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे सीईटी होणे, त्याचा निकाल या प्रक्रियांमध्ये जाणारा वेळ पाहता तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष ठरलेल्या तारखेला सुरू होईल का याबाबत साशंकता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post