रेल्वे रॅकने हजारो टन कांदा निर्यातमाय अहमदनगर वेब टीम
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा फटका कांदा निर्यातीला देखील बसला होता. अनलॉक सुरू झाल्यानंतर मात्र देशातील वेगवेगळ्या राज्यासह विदेशात कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून व्यापार्‍यांनी मनमाडच्या मालधक्क्यावरून प्रथमच थेट बांगला देशात आतापर्यंत सुमारे १५ मालगाड्यांच्या रॅकने हजारो टन कांद्याची निर्यात केली आहे.

याशिवाय इतर देशात कंटेनर तसेच देशातील वेगवेगळ्या राज्यात देखील कांद्याची मागणी होऊ वाढल्याने ट्रकच्या माध्यमातून कांदा पाठविला जात आहे. तथापि कांदा निर्यात खुली होऊन देखील अद्यापही पुरेसा भाव मिळत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी कांद्याच्या भावात मोठी वाढ झाल्यानंतर केंद्र शासनाने निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. आंदोलनांची दखल घेत केंद्र शासनाने कांदा निर्यातीबंदी उठवली.

त्यानंतर कांदा निर्यातीला सुरुवात होत नाही तोच देशात करोनाचे थैमान सुरू झाले आणि २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. एकीकडे देश-विदेशात कांदा मागणीला ब्रेक लागला तर दुसरीकडे कांद्याची आवक वाढत गेली. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकरी संकटात सापडले.

मनमाडला रेल्वे स्टेशन जंक्शन असल्याने येथून देशाच्या कानाकोपर्‍यात माल पाठविण्याची व्यवस्था आहे. मनमाडसह या भागातील व्यापारी बांगला देशात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करतात. याआधी ते पश्चिम बंगालला कांदा पाठवित होते. तेथून बांगला देशात कांदा पाठविला जात होता. यंदा मात्र प्रथमच मनमाड टू बांगलादेश मालगाडी पाठविण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यापारी थेट बांगला देशात कांदा पाठवित आहेत. आतापर्यंत मनमाडहून १५ मालगाड्यांच्या रॅकमधून कांदा पाठविण्यात आला आहे.

एका मालगाडीच्या रॅकमध्ये ४२ डबे असतात. एका डब्याची क्षमता सुमारे ४० टन असते. मनमाडच्या मालधक्क्यावरून बांगला देशात ६३० डब्यातून २५ हजार २०० टन कांदा निर्यात करण्यात आला आहे.

मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या इतर भागातील व्यापारी दुबई, मलेशिया, सौदी अरेबिया, सिंगापूर, श्रीलंका, दमाम, व्हिएतनाम व इतर देशात कंटेनरच्या माध्यमातून कांदा निर्यात करतात. एका कंटेनरची क्षमता २९ टन असते. हे कंटेनर जहाजातून पाठविले जातात. आतापर्यंत कंटेनरच्या माध्यमातून देखील हजारो टन कांदा निर्यात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतकर्‍यांची खंत

कांदा निर्यात होत असतांना दुसरीकडे मात्र त्याचा कोणताही फायदा आम्हाला झाला नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. आजही कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने त्यातून झालेला खर्च देखील निघत नसल्यामुळे आमच्यावरील संकट आजही कायम आहे, अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post