नगरात आता एका फोनवर उपलब्ध होणार मोफत रुग्णवाहिका
माय अहमदनगर वेब टीम
नगर- शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने दोन मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता शहरातील कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास व त्याची कोरोना तपासणीसाठी जाण्याची सोय नसल्यास तसेच अत्यावश्यक वैद्यकीय उपचार सुविधा मिळण्यासाठी त्याने फोन केला तरी त्यास रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. यासाठी महापालिकेने व्हेंटीलेटरसह सर्व तातडीच्या आरोग्य सुविधा असलेली 1 कार्डियाक रुग्णवाहिका आणि एक साधी रुग्णवाहिका अशा 2 रुग्णवाहिका भाडेकराराने घेतल्या आहेत. या दोन्ही रुग्णवाहिका मंगळवारी (दि.14) सकाळी महापालिकेत दाखल झाल्या. या सेवेचे सकाळी महापालिका मुख्यालयात प्रारंभ झाला.
यावेळी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नगर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसेल तर तातडीचे उपचार मिळण्यापासून सामान्य नागरिक वंचित राहतो. एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्याला कोरोनाच्या लक्षणांमुळे त्रास होत असेल तर त्याला उपचारासाठी लवकरात लवकर दवाखान्यात नेता यावे, यासाठी महापालिकेने दोन रुग्णवाहिका सेवेत उपलब्ध केल्या आहेत. यापैकी कार्डियाक रुग्णवाहिकेवर 1 डॉक्टरची नियुक्ती केली जाणार आहे.
त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्राथमिक उपचार रुग्णांना मिळणार आहेत. शहरातील नागरिकांसाठी ही सुविधा पूर्णपणे मोफत राहणार आहे.या सुविधेसाठी महापालिका नोडल अधिकारी नियुक्त कारणार असून त्याचा मोबाईल क्रमांक जनतेसाठी दिला जाणार आहे. केवळ एका फोनवर ही सुविधा मिळणार आहे. राज्य शासनाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या 108 रुग्णवाहिकेप्रमाणे ही सुविधा असणार आहे.
Post a Comment