महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाणीसाठवण टाक्यांची केली स्वच्छतामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाक्यांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून स्लॅबवरील चिखल, गवत व घाणीची साफसफाई करण्यात आली आहे. टाक्यांच्या उघड्या भागावर झाकणे टाकण्यात आली आहेत. तसेच एका सुरक्षा रक्षकाची येथे नेमणूक करण्यात आली असून लोकांना येथे येण्या-जाण्यासंदर्भात साठवण टाक्यांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख आर. जी. सातपुते यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून शहराच्या काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे अनेक नागरिकांना जुलाब, उलट्या, पोटदुखीसारख्या आजारांना सामोरे जावे लागत होते. पाणीपुरवठ्यातील दोष शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत होती. यासंदर्भात शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने महापालिकेला ऑनलाईन निवेदनही देण्यात आले होते. तसेच वसंत टेकडी येथील जलकुंभाच्या परिसरातील अस्वच्छतेबाबत ‘नवा मराठा’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची महापालिका आयुक्तांनी तातडीने दखल घेत पाणीपुरवठा विभागास कार्यवाही आदेश दिले होते.

या आदेशानुसार पाणीपुरवठा विभाग प्रमुख आर. जी. सातपुते यांनी आपल्या सहकारी अधिकारीकर्मचार्‍यांसह वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाक्यांची पाहणी केली. त्यानंतर लगेचच साफसफाईचे आदेश देत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. टाक्यांची झाकणे उघडी असल्याने त्यात घाणीसह इतर प्राणी पडण्याची भीती होती. त्यामुळे तातडीने सिमेंटच्या पट्ट्या टाकून टाक्या झाकून टाकण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा विभागप्रमुख श्री.सातपुते इंजिनिअर व स्टाफ इं. इम्रान खान, इं. आशिष शेलार, इं. संतोष भालेराव, हेडफिटर मनोज शिंदे, फिटर आपाक शेख, महामुनी व इतर कर्मचारी यांनी वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाक्यांची पाहणी करून परिसराची साफसफाई, स्लॅबवरील घाण, चिखल, गवत इ. काढून परिसर स्वच्छ केला आहे.

तसेच पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक नवीन झाकणांची ऑर्डर देखील देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 24 तास कायमस्वरूपी सुरक्षारक्षक ठेवण्याचे नियोजन करून कार्यवाही सुरू केली आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल आयुक्त व मनपा पाणीपुरवठा विभाग स्टाफचे काँग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारीयांनी आभार मानले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post