दुसऱ्या दिवशीही मनपा ठप्प ; महापालिका दुसर्‍या दिवशीही ठेवली बंदच


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महापालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच अधिकारी-कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करावी, तसेच कर्मचार्‍यांना कोरोना पासून बचावासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी कामगार युनियनने आयुक्तांकडे केली आहे.

या मागण्या मान्य होईपर्यंत कर्मचारी कार्यालयात येणार नाहीत, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे. त्यामुळे महापालिका दुसर्‍या दिवशीही बंदच ठेवण्यात आली आहे. महापालिकेतील एका विभाग प्रमुखासह काही कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे कामगार युनियनने सोमवारी (दि.13) सर्व कर्मचार्‍यांना घरी जायला सांगून महापालिका कार्यालय रिकामे केले होते. मंगळवारी (दि.14) सकाळी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब मुदगल यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिकेच्या अधिकारीकर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याने इतर कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

त्यामुळे सर्वच कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करण्यात यावी, कोरोनापासून बचावासाठी कर्मचार्‍यांना सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोव्हज या सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच काही दिवस नागरिकांना महापालिका कार्यालयात येण्यास बंदी घालण्यात यावी याशिवाय कार्यालयाचे कामकाज सुरू करणार नाही असा इशारा युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला. यावेळी बोलताना आयुक्तांनी सांगितले की, महापालिकेच्या संपुर्ण इमारतीत जंतुनाशकांची फवारणी करण्यात आलेली आहे तसेच बाधित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कातील कर्मचार्‍यांचे घशातील स्त्राव घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.

कर्मचार्‍यांसाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जातील, असे आश्वासन युनियनच्या पदाधिकार्‍यांना दिले. मात्र त्यावरही समाधान न झाल्याने युनियनने कर्मचार्‍यांना कार्यालयात येवू दिले नाही. त्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी महापालिका कार्यालय कर्मचार्‍यांविना बंद आहे. केवळ अधिकारीच कार्यालयात उपस्थित आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post