त्या अधिकाऱ्यांनी केली तपोवन रोडची पाहणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता पहिल्याच पावसात खचताच, महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व स्थानिक नगरसेवकांनी रस्त्याची पाहणी केली, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तपोवन रस्त्याच्या कामाबाबत तक्रार केली होती. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागपूर येथील एक पथक नगर शहरात दाखल झाले.

पहिल्याच पावसात तपोवन रस्ता खचल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले. तसेच, हा रस्ता डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण करून देण्याचे व तोपर्यंत ठेकेदाराला कामाचे बिल देण्यात येणार नसल्याचे लेखी आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी बारस्कर यांना दिले होते. त्यानुसार हे पथक रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले आहे. या पथकात चार अधिकारी आहेत. हे पथक तीन दिवस नगर शहरात राहणार आहे. पथकाने आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास तपोवन रस्त्याला भेट दिली. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थानिक नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, विनित पाऊलबुधे, सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post