आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्या - स्नेहलता कोल्हे



माय अहमदनगर वेब टीम
कोपरगाव - राज्यातील आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने घेऊन ते वाचविले नाही तर राज्यातील मराठा समाज सरकारला कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्रुटी ठेवून सातत्याने प्रलंबित ठेवण्याचे काम झाले; परंतु मराठा आरक्षणाचा विषय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर येताच त्यांनी समाज बांधवांना दिलेल्या शब्दाप्रमाणे हा विषय अंतिम टप्प्यात नेला.

या निर्णयाचे देखील मराठा समाज बांधवानी स्वागत केले होते. सरकार बदलताच मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण करून घेण्याची जबाबदारी राज्यातील आघाडी सरकारची असल्याने त्यांनी यासाठी विशेष नियोजन केले पाहिजे; परंतु आजपर्यंत या सरकारने कोणत्याही प्रकारचे गांभीर्य घेतलेले दिसत नाही.

त्यामुळे याप्रश्नी सरकारची अनास्था जनतेला समजली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा विषय हाताळताना अनेकांनी राजकीय भांडवल करून खोडा घालण्याचा प्रयत्न केला; परंतु न डगमगता कोणतेही पाऊल मागे न घेता त्यांनी मराठा आरक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती भूमिका बजावली. त्याच पध्दतीची भूमिका या राज्य सरकारची आहे.

लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि रोजगाराचा प्रश्न आरक्षणावर अवलंबून आहे. त्यामुळे या ऐतिहासिक अशा आरक्षणाच्या निर्णयाला सकारात्मक भूमिका ठेवून न्यायालयात टिकविण्याचे काम सरकारने करावे. परंतु राज्य सरकारला यामध्ये कोणतेही स्वारस्य दिसत नाही. मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्यापेक्षा हा प्रश्न गांभीर्याने घेऊन आघाडी सरकारने आरक्षण टिकण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण कराव्यात व आरक्षणाला वाचविण्याचे काम करावे. अन्यथा जनता या राज्य सरकारला कधीच माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post