सारथी संस्थेला ८ कोटींची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेबाबत आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेला उद्या ८ कोटींची मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती सहभागी झाले होते. तसेच यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार, मराठा समाजाचे प्रतिनिधी विनायक मेटे, विनोद पाटील हजर होते.

सारथीबाबत आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सारथी संस्था बंद होणार नाही. सारथी संस्था बंद होणार या अफवा खोट्या आहेत. 'सारथी' नियोजन विभागाच्या अखत्यारित येईल. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.  

सारथीची स्वायतत्ता टिकवायची आहे आणि ती टिकेल. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने उभी राहिलेली ही संस्था त्यांचे जिवंत स्मारक आहे. त्यासाठी अजित पवार यांनी संस्थेकडे स्वतः लक्ष घातले पाहिजे, असे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले. सारथीसाठी येत्या दशकात मास्टर प्लॅन हवा, असेही त्यांनी नमूद केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post