सर्वच मंडळांनी लोकजागृती करून महामारी नष्ट होण्यासाठी गणरायाला साकडे घालावे


माय अहमदनगर वेन टीम
अहमदनगर- देशात तसेच राज्यात कोरोनाचे संकट कायम असून जनजीवन पूर्वपदावर येण्यासही आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. या परिस्थितीमुळे सर्वच सण उत्सव साजरे करताना पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात तसेच अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणार्‍या गणेशोत्सवावरही यंदा कोरोनाचे सावट आहे. ही बाब लक्षात घेवून नगरच्या नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरा करून कोरोना विषयक जनजागृतीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव हा जनप्रबोधनाचा उत्सव मानला जातो. यंदा असेच प्रबोधन करून उत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी सर्वच मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी केले आहे. व्रत वैकल्याचा श्रावण महिना सुरु झाला असून सर्वांना आता गणेशोत्सवाचेही वेध लागले आहे. यावर्षी राज्यातील या सर्वात मोठ्या उत्सवावर कोरोना विषाणूचे सावट आहे. त्यामुळे सरकारनेही सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याला मुंबई, पुण्यातील मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून नगरमध्येही जय आनंद महावीर युवक मंडळाने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंडळाने सर्व सदस्यांची ऑनलाईन मिटिंग घेतली. यात अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी कुंतीलाल राका, महिला अध्यक्षा स्वाती चंगेडिया, सेक्रेटरी सोना डागा आदी सहभागी झाले होते.

कोरोनाला थोपविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, गर्दी टाळणे, वैयक्तिक स्वच्छता या गोष्टी करणे अनिवार्य बनले आहे. गणेशोत्सवात या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गर्दीमुळे तडा जावू शकतो. ही बाब लक्षात घेता गणेशोत्सवात नेहमीसारखा डामडौल न करता तो साधेपणाने करणे आवश्यक आहे. जय आनंद महावीर युवक मंडळाने स्थापनेपासून लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला प्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिलेला आहे.

काळाची गरज ओळखून मंडळाने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेवून पथदर्शी पाउल उचलले आहे. मंडळ उत्सव काळात विविध माध्यमातून गोरगरीब, गरजूंना आवश्यक मदत करण्याचेही नियोजन करीत आहे. इतर मंडळांनीही असाच निर्णय घेवून यंदाच्या गणेशोत्सवात कोरोना प्रतिबंधाबाबत कृतीयुक्त जागर करावा तसेच ही महामारी पृथ्वीतलावरुन कायमची हद्दपार व्हावी यासाठी विघ्नहर्त्या गणेशाला साकडे घालावे, असे आवाहन मंडळाचे सदस्यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post