केडगावला आठवडाभराचा कडक लॉकडाऊन करा

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -नगर शहराजवळ असणार्‍या केडगाव उपनगराला करोनाचा वेढा दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी करोना रुग्णांच्या संख्येचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. यामुळे केडगावच्या सर्व नगरसेवकांनी केडगावात आठवडाभराचे कडक लॉकडाऊन करण्याची मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

केडगावात दोन महिन्यांत करोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र जूनमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने आणि कॅण्टेन्मेंट झोनमधील पाहुणे छुप्या पद्धतीने केडगावात वास्तव्यास आले. तसेच ठिकठिकाणी भरणारे भाजीबाजार, फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचा उडालेला बोजवारा, रोज नगर शहरात वाढत चाललेली ये जा यामुळे गेल्या दीड महिन्यातच केडगावमध्ये करोनाने फास आवळण्यास सुरुवात केली.

आरोग्य विभाग, पोलीस यत्रंणा यांना न जुमानता नियमांची पायमल्ली वाढत गेल्याने करोनाचा फैलाव केडगावमध्ये वेगाने वाढत गेला. गेल्या दीड महिन्यातच केडगावमधील करोनाच्या रुग्णांची संख्या 50च्या घरात पोहोचली. यात काहींना जीव गमवावा लागला. एकाच कुटुंबातील बाधित सदस्यांची संख्या वाढत गेल्याने परिसरात घबराट पसरली.

शाहूनगर भाग मागील महिन्यात सील केल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढत गेली. करोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीच्या पाश्वभूमीवर केडगावमधील प्रभाग 16 व प्रभाग 17 मधील आठही नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना केडगावमध्ये आठवडाभराचा कडक लॉकडाऊन करण्याबाबत साकडे घातले आहे.

केडगावमध्ये लॉकडाऊन करण्याबाबत सर्व व्यापारी व व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली आहे. सर्वजण यासाठी सहमत आहेत. नागरिकांचीही मागणी आहे. जिल्हाधिकार्‍यांनी यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा परिस्थिती नगर शहरासारखी होईल, अशी भीती नगरसेवक विजय पठारे यांनी व्यक्त केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post