कोरोनाबाधित झालेल्या कर्मचार्‍यांचा उपचाराचा खर्च महापालिका करणार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोनाबाधीत आढळलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍यांवरील उपचाराचा खर्च वैद्यकीय प्रतिपूर्ती योजने अंतर्गत महापालिका प्रशासन करणार असल्याचा निर्णय आयुक्त व कामगार युनियनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये म हापालिका कर्मचार्‍यांसाठी काही बेड राखीव ठेवण्याची मागणीही आयुक्तांनी मान्य केली असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली. जिल्हा शासकीय रुग्णालय व बूथ हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी केलेली व्यवस्था आता कमी पडू लागली असल्यामुळे महापालिकेच्या कोरोनाबाधीत कर्मचार्‍यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च या कर्मचार्‍यांच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे महापालिका प्रशासनाने कर्मचार्‍यांचा उपचाराचा खर्च करावा, अशी मागणी युनियनने आयुक्तांकडे केली होती.

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात महापालिकेची सर्व कर्मचारी जीव धोक्यात घालून शहरातील नागरिकांना सेवा पुरवत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचाराचा खर्च महापालिका प्रशासनाने करणे गरजेचे आहे, असे युनियनचे म्हणणे होते. या मागणीसाठी युनियनने केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय प्रतीपुर्ती योजने अंतर्गत हा खर्च महापालिका प्रशासन करणार असल्याचे कबूल केले आहे. याशिवाय शहरात सुरू असलेल्या तीन खासगी कोविड केअर सेंटरला मान्यता देण्याचे अधिकार महापालिकेला असल्याने या सेंटरमध्ये महापालिका कर्मचार्‍यांसाठी काही बेड राखीव ठेवावेत अशी मागणी युनियनने केली तिही आयुक्तांनी मान्य केली असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

महापालिका कर्मचार्‍यांचे ‘अ‍ॅण्टीजेन रॅपीड टेस्ट’

मागील आठवड्यात महापालिकेच्या मुख्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर मुख्यालयातील सर्वच कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करावी अशी मागणी कामगार युनियनने करत तीन दिवस कामकाज बंद ठेवले होते. त्यानंतर मुख्यालयातील कर्मचार्‍यांची थर्मल स्कॅनींग व पल्स ऑक्स टेस्ट करण्यात आली होती. परंतु, ‘अ‍ॅण्टीजेन रॅपीड टेस्ट’ केलेली नव्हती. त्यामुळे युनियनने पुन्हा पाठपुरावा केल्यामुळे सोमवारी (दि.20) दुपारी मुख्यालयातील कर्मचार्‍यांची ‘अ‍ॅण्टीजेन रॅपीड टेस्ट’ करण्यात आली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, उपायुक्त आयुब शेख आदी उपस्थित होते.

प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचार्‍यांचीही होणार तपासणी

मुख्यालयातील कर्मचार्‍यांची तपासणी झाल्यानंतर आता प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचार्‍यांचीही प्रथम थर्मल स्कॅनींग, पल्स ऑक्स व त्यानंतर ‘अ‍ॅण्टीजेन रॅपीड टेस्ट’ केली जाणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. महापालिकेचे अधिकारीकर्मचारी नगर शहरातील जनतेचे दैनंदिन कामकाज करत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्यामुळे कर्मचार्‍यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. याशिवाय वॉर्डात काम करणार्‍या सफाई कामगार व इतर कर्मचार्‍यांच्या दर सोमवारी व गुरुवारी तपासण्या करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post