दुध उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या


माय अहमदनगर वेब टीम
राहुरी - तालुक्यातील दरडगांव तर्फे बेलापूर येथील पोलीस पाटील रेवन्नाथ मुरलीधर काळे (वय ५५) यांनी आज (बुधवारी) पहाटे राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. "दुधाला भाव नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली." असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

मृत काळे अल्पभूधारक शेतकरी आहेत. दुग्ध व्यवसाय त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. श्रीरामपूर येथे गांधी पुतळ्यासमोर दूध आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. त्यांच्यामागे दोन पत्नी दोन मुलगे, तीन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे. गणेश व योगेश काळे यांचे ते वडील होते.
मृत काळे यांचे बंधू अरुण काळे व त्यांचे शेजारी राजेंद्र भांड यांनी सांगितले की, "मृत काळे यांच्याकडे वीस गाई आहेत. ७०-८० लिटर दूध डेअरीला जाते. शेती अत्यल्प असल्याने परिवाराच्या उदरनिर्वाहाचे दूध धंदा हे एकमेव साधन होते. करोना लॉकडाऊनमुळे दुधाचे दर घसरले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. गायांना पशुखाद्य आणायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. गायांचे हाल त्यांना पाहवत नव्हते. त्यांची सहनशक्ती संपल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली आहे."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post