म्हणून उद्या पासून कामकाज सुरळीतमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कार्यालयात काही दिवस नागरिकांना येण्यास प्रतिबंध घालावा तसेच मुख्यालयातील सर्व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले महापालिकेचे कामकाज गुरुवारपासून (दि. 16) नियमितपणे सुरू होणार आहे.

यासंदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त व कामगार युनियनची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील एक खातेप्रमुख आणि काही कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याने या कार्यालयात काम करणारे कर्मचारी धास्तावले आहेत. या सर्व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी कामगार युनियनने केलेली आहे. याबाबत बोलताना युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे म्हणाले, सर्वच कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करण्यापेक्षा अँटीजेसीक ही रॅपिड टेस्ट करण्यात यावी. तसेच पल्स ऑक्स आणि थर्मल स्कॅनिंग करण्यात यावे एवढीच आमची मागणी आहे. या तीन टेस्ट केल्यानंतर ज्यांची आवश्यकता आहे अशाच कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करावी, असे आम्ही प्रशासनाला सुचविले आहे.

त्याचबरोबर काही दिवस नागरिकांना महापालिका कार्यालयात येण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी केलेली आहे. याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले होते. मात्र आरोग्य विभागाकडून त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी वर्ग धास्तावलेला असून, त्यांची कार्यालयात येऊन काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत कर्मचारी कार्यालयात येणार नाहीत, असेही लोखंडे यांनी सांगितले होते.

त्यानंतर दुपारी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त व युनियनच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधून बैठक घेत चर्चा घडवून आणली. कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार त्यांची आरोग्य तपासणी गुरुवारी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेच सुरू करण्यात येईल. मागणी मान्य झाल्यामुळे कामगार युनियननेही गुरुवारपासून सर्व कर्मचारी कामावर येतील, असे सांगितले असल्याची माहिती महापौर वाकळे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post