साईबाबा संस्थानला करोनाचा पावणे चार कोटींचा फटकामाय अहमदनगर वेब टीम
शिर्डी - श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने यावर्षी शनिवार दि. 4 जुलै 2020 ते सोमवार दि. 6 जुलै 2020 या कालावधीत आयोजित केलेल्या श्रीगुरुपौर्णिमा उत्सवामध्ये साईंच्या झोळीत 79 लाख 36 हजार 549 रुपये इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. मागील वर्षी श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये एकूण रुपये 04 कोटी 52 लाख देणगी प्राप्त झाली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुमारे पावणे चार कोटींना फटका संस्थानला बसला आहे.

श्री. डोंगरे म्हणाले, यावर्षी देश व राज्यावर आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपायांकरिता शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले असून दि. 17 मार्चपासून श्रीसाईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे शनिवार दि. 4 जुलै 2020 ते सोमवार दि. 6 जुलै 2020 याकालावधीत साजरा करण्यात आलेला श्रीगुरुपौर्णिमा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

यात श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये एकूण रुपये 79 लाख 36 हजार 549 रुपये देणगी प्राप्त झाली असून यामध्ये देणगी काउंटर 01 लाख 18 हजार 387 रुपये, डेबीट-क्रेडीट कार्ड, चेक-डी.डी., मनी ऑर्डर देणगीव्दारे रुपये 10 लाख 63 हजार 389 रुपये तसेच ऑनलाईन देणगीव्दारे 67 लाख 54 हजार 773 रुपये, यांचा समावेश आहे.

मागील वर्षी श्रीगुरुपौर्णिमा उत्सवामध्ये एकूण रुपये 04 कोटी 52 लाख देणगी प्राप्त झाली होती तसेच मागील उत्सवाच्या कालावधीत 01 लाख 86 हजार 783 साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला होता,असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post