खासगी प्रयोगशाळांना २४ तासांत अहवाल द्या


माय अहमदनगर वेब टीम
पुणे - करोनाच्या संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने, खासगी प्रयोगशाळांनी २४ तासांत अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी सहा वाजेपर्यंत संबंधित प्रयोगशाळांना अहवाल सादर करावे लागणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. म्हैसेकर यांनी खासगी प्रयोगशाळा चालकांची आढावा बैठक घेतली. त्यात हे आदेश दिले.

डॉ म्हैसेकर म्हणाले, 'प्रयोगशाळांना २४ तासांत अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे अहवाल संबंधित रुग्ण राहात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणेकडे द्यावे लागणार आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. चाचणीबाबतचा अहवाल देण्यासाठी प्रत्येक प्रयोगशाळेने एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.' 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहरालगतच्या गावांत मोबाइल रुग्णवाहिकेची सोय करणार असल्याचे सांगितले. गुजरवाडी, निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, उंड्री, पिसोळी, भिलारेवाडी या गावांतील करोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. हवेली तालुक्यातील गुजर-निंबाळकरवाडी येथे करोनाचे निदान झाल्यानंतरही जिल्हा परिषदेकडून दखल न घेतल्याने आणि उपचारासाठी खाटा उपलब्ध नसल्याने ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित गावांना भेट दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post