तोफखाना कंटेन्मेंट झोनबाबत आज निर्णय



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - तोफखाना भागातील कंटेन्मेंट झोनची मुदत रात्री बारा वाजता संपुष्टात आली असली, तरी तेथील निर्णय आज घेण्यात येणार आहे. तो पर्यंत कंटेन्मेंट झोनची बंधने कायम राहणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली. दरम्यान, शहरातील खासगी व अन्य आस्थापनांतील कर्मचार्‍यांचा कोविड चाचणी करून घेण्याबाबतही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

तोफखाना भागात करोना बाधितांची संख्या मोठी आढळल्याने तेथील परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. याची मुदत 7 जुलैला रात्री बारा वाजता संपुष्टात आली. मात्र मध्यंतरीही या भागात बाधितांची संख्या वाढतच होती. मुदत संपत असल्याने आयुक्त मायकलवार व महापालिकेच्या अधिकार्‍यांनी या परिसरात जाऊन पाहणी केली.

नव्याने आढळलेले रुग्ण कोणत्या परिसरात आहेत, सध्याची काय स्थिती आहे, याची पाहणी केली. या भागातील काहींचे स्वॅब नुकतेच घेतलेले असून, त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. हे अहवाल आज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंटेन्मेंट शिथिल करण्याबाबतचा निर्णय काल जाहीर झाला नाही. त्यावर आज निर्णय होणार आहे.

परिसरात ठराविक भागातच रुग्ण असतील तर कंटेन्मेंट करताना मायक्रो कंटेन्मेंट करता येईल का, याचाही विचार करण्यात येणार आहे. महापालिकेने रामकरण सारडा वसतिगृहात स्वॅब घेण्याची सुविधा निर्माण केली आहे. या ठिकाणी जाऊन खासगी आस्थापना, गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, व्यावसायिक आस्थापना व निवासी व्यक्तींनी कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी, असे निर्देश आयुक्त मायकलवार यांनी दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post