१७ जुलैपर्यंत सायंकाळी ७ नंतर संचारबंदी; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आदेश




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर महापालिका हद्द व भिंगार छावणी परिषद हद्दीमध्ये शुक्रवार (दि.३) पासून १७ जुलैपर्यंत सायंकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी २६ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी ३१ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. मात्र तरीही महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवडाभरापासून मोठी वाढ झाली असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी महापालिका हद्द व भिंगार छावणी परिषद हद्दीमध्ये ३ ते १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

सायंकाळी ७ ते सकाळी ५ पर्यंतच्या कालावधीसाठी असलेले निर्बंध

तातडीच्या वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त व्यक्तींच्या हलचालीस बंदी असेल. तथापि कन्टेन्मेंट झोन वगळता खालील बाबतीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. १) शासकीय निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम, अस्थापना यांच्याकडील कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी २) रुग्णालये, दवाखाने, औषधे, फार्मा, पॅथॉलॉजी लॅबोरोटरी संबंधित आस्थापना ३) इलेक्ट्रीसिटी, पेट्रोलियम, ऑईल आणि ऊर्जा संबंधित व्यक्ती, आस्थापना ४) दूरसंचार, इंटरनेट सेवा पुरविणार्‍या आस्थापना ५) प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी ६) अन्न-धान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तुंची होम डिलिव्हरी सेवा ७) पिण्याचे पाणी पुरवठा व दुरुस्ती विषयक कामकाजाचे संबंधित सेवा ८) मालवाहतूक करणारे ट्रक, टेम्पो यांना या आदेशातून सवलत राहणार आहे.

सकाळी ५ ते सायंकाळी ७ या कालावधीसाठीचे आदेश

जिल्हाधिकारी यांनी ३० जून रोजी काढलेल्या आदेशात परवानगी दिलेले सर्व व्यवहार, कृती, क्रीया यांना परवानगी असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींना कन्टेंन्मेंट झोन वगळता जवळच्या लगतच्या परिसरामध्ये हलचालीस परवानगी राहिल. शहराच्या दूरच्या भागामध्ये हालचालीस परवानगी राहणार नाही. महापालिका हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करणार्‍यास या आदेशान्वये मनाई करण्यात आलेली आहे.
सदरचा आदेश शुक्रवार (दि.३) ते १७ जुलैपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर कारवाईसाठी २६ पथके नेमण्यात आली असून शहरातील प्रमुख ठिकाणी फिक्स पॉईंटवर ही पथके दररोज सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत तैनात राहणार आहेत. तातडीच्या वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडणार्‍या व रस्त्यावर येणार्‍या नागरिकांवर या पथकामार्फत कारवाई केली जाणारा आहे.

या पथकामध्ये जिल्हा परिषदेचे विविध विभाग, पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, समाजकल्याण विभाग अशा विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील मान्यताप्राप्त खासगी शाळांमधील शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पथकांसमवेत पोलिस कर्मचारीही असणार आहेत.

नगर शहर व भिंगार मधील फिक्स पॉइंट

नगर शहरातील तेलीखुंट, कापडबाजार, दिल्लीगेट, अप्पूहत्ती चौक, लालटाकी, राज चेंबर्स कोठला, पारिजात चौक, गुलमोहोररोड, प्रोफेसर चौक (सावेडी), एकविरा चौक (सावेडी), ढवण वस्ती, कंवर महाराज पुतळा (तारकपूर), भिस्तबाग चौक (सावेडी), नेप्ती नाका (कल्याण रोड), आयुर्वेद महाविद्यालय कॉर्नर, केडगाव येथील हॉटेल रंगोली जवळील चौक, बुरुडगाव रोडवरील चाणक्य चौक, कोठी चौक (मार्केटयार्ड रोड), पाचपीर चावडी (माळीवाडा), शिवनेरी चौक (रेल्वे स्टेशन), केडगाव बायपास, इम्पिरियल चौक, इरिगेशन मस्जिद (मुकुंदनगर), डीएसपी चौक तसेच भिंगार मधील भिंगार वेस, विजय लाईन चौक, भगवानबाबा चौक, मुठी चौक, आदी ठिकाणी ही पथके तैनात राहून नियम मोडणार्‍या नागरिकांवर कारवाई करणार आहेत.

…तर पथकातील अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई

या पथकांमध्ये नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांनी सायंकाळी ७ पुर्वीच नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, अन्यथा जबाबदारी पार न पाडल्यास साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post