त्वचारोपण म्हणजे काय रे भाऊमाय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - हृदयारोपण, मूत्रपिंडरोपण असे शब्द तुम्ही ऐकले असतील. रोगग्रस्त हृदय, मूत्रपिंड यांच्या जागी पर्यायी हृदय वा मूत्रपिंड बसवणे असा त्याचा अर्थ होय. त्याचप्रमाणे त्वचारोपण याचा अर्थ त्वचेचे रोपण करणे किंवा त्वचा बसवणे असा होतो. आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक इंद्रिय म्हणजे त्वचा होय. त्वचेची अनेक कार्ये आहेत. स्पर्शज्ञान हे महत्त्वाचे कार्य आहे. त्वचेखाली असलेल्या चरबीमुळे त्वचा आपले थंडीपासून रक्षण करते. त्वचेत असलेल्या घामाच्या ग्रंथीमुळे तापमान नियंत्रण, तसेच शरीरातील पाणी व क्षार यांचे नियंत्रण होण्यास मदत होते.

त्वचेमुळे सर्व इंद्रियांचे, स्नायूंचे रक्षण होते. त्वचेमुळे थंडी, उष्णता, वेदना यांचे आपल्याला ज्ञान होते व आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. त्वचा नसेल तर काय होईल? भाजलेल्या व्यक्तीत याचे उत्तर आपल्याला सापडते. भाजलेल्या व्यक्तीमध्ये त्वचा नष्ट होते. त्यामुळे पर्यावरणातील जीवजंतू सरळ शरीरात प्रवेश करतात. बर्‍याचदा भाजलेल्या रुग्ण अशा जंतूसंसर्गांमुळेच मृत्युमुखी पडतो. असे हे त्वचेचे महत्त्व. काही रुग्णांमध्ये त्वचारोपण करावे लागते. यासाठी रुग्णाची स्वतःचीच (शरीराच्या इतर भागाची) किंवा दुसर्‍या व्यक्तीची त्वचा वापरली जातो.

त्वचेमध्ये बाह्यत्वचा व अंतःत्वचा असे दोन थर असतात. त्वचारोपणाच्या एका पद्धतीत दात्याच्या बाह्यत्वचेचा सर्व भाग व त्यालगतचा अंतःत्वचेचा भाग घेतला जातो व तो रुग्णाच्या शरीरावर आवश्यक तेथे बसवला जातो. दुसर्‍या पद्धतीत दात्याच्या संपूर्ण त्वचेचा (बाह्य व अंतःत्वचा) तुकडा कापून घेऊन तो रुग्णासाठी वापरला जातो. या पद्धतीत या दान केलेल्या त्वचेला ताबडतोब रक्तपुरवठा सुरू होणे गरजेचे असते. काही वेळा रुग्णाच्या शरीराच्या एका भागावरील त्वचा (तिचा रक्तपुरवठा सुखरूप ठेवून) दुसर्‍या भागावर बसवली जाते. कालांतराने तेथील रक्तपुरवठा सुरू झाल्यानंतर या त्वचेचा आधीच्या भागाशी असलेला संपर्क कापून टाकला जातो. असे हे त्वचारोपण. प्लॅस्टीक सर्जरीमध्ये याचे फारच महत्त्व आहे. इतरही अनेक गंभीर अपघातात, भाजलेल्या रुग्णात त्वचारोपणाने व्यक्तीचे प्राण वाचवता येतात. तसेच शारीरिक विद्रूपताही टाळता येते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post