आता ऑनलाईन रोजगार मेळावेमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला असून सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत राज्यात आतापर्यंत एकूण १४ ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावे झाले असून त्यास उद्योजक व उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ऑनलाईन मेळाव्‍यांमध्‍ये एकूण ११५ उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली १२ हजार ३२२ रिक्‍तपदे अधिसूचित केली आहेत. यामध्ये २५ हजार ४७ उमेदवारांनी ऑनलाईन भाग घेतला व त्यापैकी १ हजार २११ उमेदवारांची निवड झाली असून इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु आहे अशी माहितीही मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना नोकरी आणि उद्योजकांना कुशल उमेदवार मिळवून देण्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा प्रभावीपणे वापर करून हे मेळावे घेतले गेले. पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली आणि ठाणे येथील जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयांनी प्रत्येकी १ ऑनलाईन रोजगार मेळावा घेतला. नाशिक आणि यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी २ तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर यांनी ४ ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले.

या ऑनलाईन मेळाव्यांमध्ये सर्व रोजगार इच्छूक व ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार संबंधित उद्योगांकडे मुलाखतींचे नियोजन करुन संगणक प्रणालीद्वारे एसएमएस पाठवून अवगत करण्यात येते. तसेच त्यांच्या मुलाखती दूरध्वनी, व्हॉटस्ॲप, स्काईपद्वारे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कंपनीमध्ये ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने घेतल्या जातात. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व बाबींचे समन्वय कौशल्य विकास कार्यालयांमार्फत केले जाते. महास्वंयम वेबसाईट यात महत्वपूर्ण भूमिका बजावते. यापुढील काळातही ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍याबाबत कॅलेंडर तयार करण्‍यात आले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

सर्व उमेदवार व उद्योग यांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देवू केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचणी असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post