कोरोनाबाधित क्षेत्रात दैनंदिन सफाईस महानगरपालिका कर्मचार्‍यांचा नकार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहरातील कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात दैनंदिन साफसफाई करण्यास महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी नकार दिल्याने नगरसेविका सोनाली चितळे यांनी बुधवारी (दि.1) सकाळी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र देवून समस्या मांडली. याची तातडीने दखल घेत आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कामगार युनियनचे पदाधिकारी व स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेत सफाई कर्मचार्‍यांना आवश्यक सुविधा पुरविण्याच्या आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना देत हा प्रश्न मार्गी लावल्याचे नगरसेविका चितळे यांनी सांगितले.

नालेगांव येथील वाघ गल्ली व तोफखाना येथे कोरोनाचे काही बाधित रुग्ण सापडले असल्याने नालेगांव व तोफखाना हा मोठा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहिर केलेला आहे. या झोनमध्ये एकीकडे दूध, भाजीपाला, किराणा व औषधे असे जीवनावश्यक वस्तू पुरावण्यासाठी मनपाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती केलेली आहे. हे कर्मचारी अत्यंत व्यवस्थित सेवा पुरवित असतानाच दुसरीकडे मात्र दररोजची साफसफाई करणारे कर्मचारी मात्र बाधित गल्लीमधील दैनंदिन साफसफाई कचरा उचलण्याचे काम करीत नाही. याबाबत अनेक नागरिकांनी नगरसेविका चितळे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सौ.चितळे यांनी सदर प्रकरणाची माहिती घेतली असता मुकादम यांनी सांगितले की, आम्हाला बाधित क्षेत्रात काम करू नका असे सांगितले आहे.

शहरामध्ये रोज पाऊस पडत आहे. त्यामुळे कचरा ओला झाल्यामुळे त्याची दुर्गधी सुटते. या ठिकाणचा कचरा साफसफाई करून जमा करून न घेतल्यास त्या ठिकाणी आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. या निमित्ताने साथीच्या रोगांना आमंत्रण दिल्यासारखेच आहे. त्यामुळे सौ.चितळे यांनी आयुक्तांना पत्र पाठवून ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणली. त्याची तातडीने दखल घेत आयुक्त मायकलवार यांनी मुकादम, स्वच्छता निरीक्षक, तसेच कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांना बोलावून घेत विचारणा केली. त्यावेळी सफाई कर्मचार्‍यांना सॅनिटायझर, मास्क तसेच हँड ग्लोज आदी साहित्य मिळत नसल्याने कर्मचार्‍यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना सांगितले. त्यावर तातडीने सर्व सफाई कामगारांना आवश्यक सुविधा पुरविण्याच्या आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे कामगारांनीही सफाईची कामे करण्याची तयारी दर्शविली असल्याचे नगरसेविका सौ.सोनाली चितळे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post