सावेडी कचरा डेपो स्थलांतरणास बुरुडगांवकरांचा विरोधमाजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - सावेडी उपनगरातील कचरा डेपोस बुरुडगांव येथे स्थलांतरीत करण्याचा मनपा महासभेत विषय असून या स्थलांतरानास येथील नागरिकांचा विरोध असून, त्याबाबतचे निवेदन मनपा उपायुक्त यांना माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, अरुणराव शिंदे, जालिंदर वाघ, जालिंदर कुलट आदि उपस्थित होते.

मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरित लवादाने दिलेल्या आदेशाप्रमाणे बुरुडगांव कचरा डेपो येथे 100 टनी कचरा प्रकल्प चालू झाला असून, नव्याने सावेडी येथील 50 टन कचरा प्रकल्प सावेडी येथेच याच ठिकाणी उभारण्याचा आदेश आपणालास लवादाने दिलेला आहे.

सावेडी कचरा प्रकल्पासाठी मनपा मार्फत आजपर्यंत अंदाजे 4 ते 5 कोटी रुपये विविध विकास कामांसाठी (रस्ते, कंपौड, शेड) इ. खर्च केेलेला असून, तो खर्च व्यर्थ जाणार आहे. तसेच सावेडी ते बुरुडगांव हे अंतर 10 कि.मी. असून, तेथील कचरा वाहतुकीचा खर्च अवाढव्य असून, तो भार नागरिकांवर पडणार आहे. तसेच मनपा झाल्यानंतर शहराच्या चारही झोनमध्ये कचरा डेपो, अमरधाम, विविध कामांसाठी जागा आरक्षित केलेल्या आहेत, मोठ्या शहरामध्ये कचर्‍याची विल्हेवाट त्या-त्या विभागातच लावली जाते.

आज शहरामध्ये कुठेही कचरा कुंडी ठेवण्यास विरोध होत असतांना बुरुडगांवला ग्रामस्थ मात्र मनपाचा कचर्‍यापासून त्रस्त आहेत. प्रदुषणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आले आहे. बुरुडगांव साथीच्या रोगांना बळी पडत आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले असून, सदर प्रकल्पास स्थलांतरास बुरुडगांवकरांचा तीव्र विरोध असून, सदर अर्जाचा गंभीर विचार करुन सदर विषय महासभेतूनच वगळावा, अन्यथा बुरुडगांवकर तीव्र आंदोलन हाती घेतील, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर माजी महापौर भगवान फुलसौंदर, अरुणराव शिंदे, जालिंदर वाघ, जालिंदर कुलट, माजी नगरसेविका कांताबाई शिंदे आदिंच्या सह्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post