लॉकडाऊनमुळे परराज्यातील व्यापारी आलेचं नाही



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - गणेश मूर्तीसाठी नगर शहराचा नावलौकिक देशभर झाला आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणावर व्यापारी मूर्ती खरेदीसाठी येतात. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे परराज्यातील व्यापारी आलेले नाहीत. त्यातच कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने गणेश मूर्तीकरांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची भीती निर्माण झाली आहे. परिणामी त्यांनी मूर्ती निर्मिती निम्म्याने कमी केली आहे.

जिल्ह्यामध्ये दोन हजारांपेक्षा अधिक गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. शहरातील मूर्तीकारांची कला ही आकर्षक आणि सुबक असल्याने पेण (रायगड) येथील मूर्तीकार कच्च्या मूर्ती नगरच्या कलाकरांकडे रंग कामासाठी पाठवितात. याच मूर्ती मुंबईमध्ये विक्रीसाठी पाठविल्या जातात. पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना या शेजारील जिल्ह्यांसह गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील मोठे व्यापारीही मूर्ती खरेदीसाठी नगरला प्राधान्य देतात.

नगर शहरात 20 वर्षांपूर्वी गणेशमूर्तींचे 15 कारखाने होते. नवीन तंत्रज्ञानामुळे अलिकडच्या काळात गणेशमूर्ती तयार करणार्‍या कारखान्यांची संख्या वाढली आहे. मूर्ती तयार केल्यानंतर हवेशीर जागेत ही वाळवावी लागते. त्यामुळे शहराच्या बाहेरील भागात कारखाने उभारले जात आहेत. नगर-कल्याण महामार्गावरील शिवाजीनगर भागात जवळपास 50 कारखाने आहेत. तालुक्याचे मुख्यालय आणि मोठ्या गावांमध्ये मूर्ती तयार केल्या जात आहेत. जिल्ह्यात सुमारे 2 हजारांपेक्षा अधिक कारखान्यातून मूर्ती तयार केल्या जात आहेत.

मूर्ती तयार करण्यासाठी मध्यप्रदेश आणि बिहारमधील कारागीर नगरला येत आहेत. विदर्भातील यवतमाळ, मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आदी भागातील कारागीर येथे येत आहेत. हे कारागीर कुटुंबासह कारखाना परिसरात राहतात. मूर्ती तयार करण्यावर त्यांची रोजंदारी ठरलेली असते. त्यामुळे ते कुटुंबासह जास्तीत-जास्त मूर्ती तयार करतात. मूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. मूर्ती निर्मितीला खरा वेग हा जानेवारी महिन्यापासून येत असतो. उन्हाळ्यातील हवामान मूर्ती सुकण्यासाठी अनुकूल असते. उन्हाळ्याच्या कालावधीत मोठ्या मूर्ती तयार करण्यास वेग असतो. त्यानंतर लहान मूर्ती तयार केल्या जातात.

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जानेवारी महिन्यांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती तयार करण्यास मनाई करणारा अध्यादेश काढला. महामंडळाचा हा अध्यादेश येईपर्यंत अनेक कारखान्यांनी मूर्ती तयार केल्या होत्या. मूर्तीकार संघटनेच्या प्रतिनिधीशी झालेल्या चर्चेनंतर यावर्षी पीओपी मूर्तीस परवानगी देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला.

कोरोना प्रतिबंधासाठी दि.17 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने परप्रांतीय आणि बाहेरील जिल्ह्यातील कारागीर गावाकडे परतले. त्यामुळे सुमारे दोन महिने कारखाने बंद होते. लॉकडाऊन शिथिल होताच काही कारागीर पुन्हा परतले. मधल्या काळात स्थानिक कारागिरांना त्यांची कमतरता भरून काढली. त्यामुळे कारागिरांचा प्रश्न कारखानदारांपुढे राहिलेला नाही.

मूर्तीसाठी आवश्यक असणार्‍या साहित्याचे उत्पादन ही घटलेले आहे. मालाची वाहतूक करण्यासाठी खर्चात मोठी वाढ झाली आहे. कच्च्या मालासाठी जादा रक्कम मोजावी लागत आहे. पीओपीची 25 किलो वजनाची गोणी 200 ते 225 रुपयांना झाली आहे. टेराकॉट रंगाची 500 एमएलची बाटली 185 ते 200 रुपयांना झाली आहे. गणेशमूर्तींतील नाविन्याला दरवर्षी जास्त मागणी राहत असते. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक या सोशल मीडियावर गणेश चतुर्थीसह अन्य दिवशी श्री गणेशाच्या आकर्षक प्रतिमा व्हायरल होत असतात. अशा नाविन्यपूर्ण प्रतिमांवरून मूर्तीकारांनी यावर्षी मूर्ती साकारल्या आहेत. गायकृष्ण, विठ्ठलाचा अवतार, शंकरच्या रूपात, वेलिंग, वरदहस्त, राजेशाही, पाळणा (झुला), राममंदिर, शंखातील गणेश, मोर, बदक, वाघांवरील आसनस्थ मूर्ती साकारल्या जात आहेत.

मूर्तीकारांची भिस्त स्थानिकांवरच

जून-जुलैत मूर्ती खरेदीसाठी येणारे परराज्यातील व्यापारी लॉकडाऊनमुळे आले नाहीत. पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये लॉकडाऊन कडक असल्याने तेथील व्यापारी किती प्रमाणात येणार याबाबत सशंकता आहे. त्यामुळे मूर्तीकरांची सर्व भिस्त स्थानिक व्यापार्‍यांवर आहे. त्यातच शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दरवर्षी एवढे नियमित उत्पादन घेण्याबाबत कारखानदार तयार नाहीत.
     

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post