लाईट…शुटींग…कॅमेरा अॅक्शन; चित्रपटसृष्टी झगमगणार


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे गेल्या सव्वादोन महिन्यांपासून चित्रपट शुटींग बंद आहे. रामायण, महाभारत, शक्तिमान यासारख्या जुन्या पण गाजलेल्या मालिका सध्या घराघरांत सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीमध्ये शुटींग सुरु व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

राज्य शासनाने पाचव्या लॉकडाऊनदरम्यान काही बदल केले आहेत. यामध्ये हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत शुटींग सुरु करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार असून सर्व नियम पाळले जावेत अशी सूचना सांस्कृतिक कार्य विभागाने जाहीर केली आहे. त्रयामुळे मुंबईत शुटींगचा मार्विग मोकळा झाला आहे. यामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास सशर्त मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईतील सिनेसृष्टी पुन्हा एकदा झगमगून उठणार असल्याने चैतन्याचे वातावरण आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रीकरणाला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सांस्कृतिक कार्य विभागाने दखल घेऊन हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबईतील  शुटींग सुरु होणार नसेल तर नाशिकला पर्याय द्यावा असेही अनेक निर्मात्यांनी म्हटले होते. यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करोना संसर्ग होणार नाही याची सर्व काळजी घेऊन काही ठिकाणी शुटींगला परवानगीदेखील दिली होती.

गेल्या महिन्यांहून शुटींग बंद असल्याने अनेक चित्रपट-मालिका रखडल्या आहेत. चित्रपटनिर्मितीशी संबंधित प्रत्येक विभागात काळजी घेऊन चित्रीकरण करता येईल, यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, उपाययोजना यांचे ३७ पानी सादरीकरण के ले होते. या सगळ्यावर विचारविनिमय करून शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्मात्यांना चित्रपटनिर्मितीपूर्वीची आणि नंतरची कामे करता येतील असे सांगण्यात आले आहे.

शुटींगची परवानगी दिल्यानंतर ८५ मालिका, १५ नवीन मालिका, ओटीटीच्या काही मालिका तसेच चित्रपटांच्या कामांना गती मिळणार असल्याचे निर्माते सांगत आहेत.

मुंबईत चित्रीकरणासाठी निर्मात्यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांच्याकडे तसेच उर्वरीत जिल्ह्यामध्ये शुटींगसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी लागेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post