पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला 'हा' कानमंत्र!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - वादळग्रस्त रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात जाऊन भेट घेतली. यावेळी दोहोंत सुमारे तासभर सखोल चर्चा झाली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अतोनात हानी झाली आहे. एकट्या रायगड जिल्ह्यातच किमान पाच लाख घरांची पडझड झाली आहे. त्याशिवाय नारळ आणि पोफळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी रायगडचा दौरा करून तेथील स्थितीची प्रत्यक्ष पाहणीही केली आहे. या दोन्ही जिल्ह्यांना तातडीची मदतही जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याला १०० कोटी तर रत्नागिरी जिल्ह्याला ७५ कोटींची मदत देण्यात आली आहे. एकीकडे सरकारी यंत्रणा स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी धडपडत असताना खुद्द शरद पवार यांनीही थेट फिल्डवर जाऊन आढावा घेतला. दोन्ही जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागांना पवारांनी भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. हा दौरा बुधवारी उरकल्यानंतर आज लगेचच पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. वादळग्रस्तांना सावरण्यासाठी कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबत विविध अंगांनी या बैठकीत चर्चा करण्यात आली. सुमारे एक तास ही बैठक सुरू होती. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
बैठकीनंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांना माहिती दिली. आजच्या बैठकीत शरद पवार यांनी कोकण दौऱ्याबाबत तपशील मुख्यमंत्र्यांना सांगितला. तेथे घरांचे, बागायतींचे, पर्यटन व्यवसायाचे, मच्छिमारांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची कल्पना पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिली. आधीच करोना संकट असताना निसर्ग वादळाच्या आघाताने दुहेरी कात्रीत स्थानिक नागरिक सापडला आहे. त्याला लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे तटकरे म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. छोट्या छोट्या वाड्यांमध्ये जात त्यांनी स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधला व नेमकी स्थिती जाणून घेतली. या पाहणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी मुंबईत परतल्यावर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य असा निर्णय घेतला जाईल. गरज भासल्यास केंद्राकडे जाऊन मदतीची मागणी केली जाईल. यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतील, असे शरद पवार म्हणाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post