महाराष्ट्र काय करतोय हे देशाला दाखवायचंय




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  'आयसीयू बेडची सुविधा असलेल्या कोविड रुग्णालयांची उभारणी हे महाराष्ट्राचं मोठं काम आहे. देशात कुणी ही सुविधा उभारलीय असं वाटत नाही. त्यामुळं या रुग्णालयांचे फोटो काढून मला हवे आहेत. महाराष्ट्राच्या प्रशासनाचं हे कर्तृत्व मला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत दाखवायचं आहे. करोनामुळं महाराष्ट्र डगमगलेला नाही, लढतो आहे हे देशाला दाखवायचं आहे,' असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.
-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एमएमआरडीएनं उभारलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कोविड रुग्णालयाचं व ठाण्यातील कोविड सेंटरचं ई लोकार्पण आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झालं. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 'गेल्या दोन महिन्यांत आरोग्य सुविधांच्या बाबतीत महापालिका प्रशासन, एमएमआरडीए व अन्य शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केलं. 'करोनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. रोजच्या रोज नवनव्या आरोग्य सुविधांचं उद्घाटन होतंय. औरंगाबाद, रत्नागिरी, ठाणे सगळीकडे सुविधा निर्माण होत आहेत. पहिला रुग्ण राज्यात सापडला तेव्हाची आणि आजची परिस्थिती यात मोठा फरक आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचे आजचे आकडे घाबरवणारे आहेत. इतर कुठेही अशी परिस्थिती असती तर कदाचित ते हबकून गेले असते. पण आपण डगमगलो नाही. करोनाची साथ आली तेव्हा या रोगाची चाचणी करण्यासाठी राज्यात अवघ्या दोन लॅब उपलब्ध होत्या. तिसरी लॅब नव्हती. पण दोन-सव्वा दोन महिन्यात शंभरच्या आसपास लॅब उभ्या राहिल्या आहेत. ठाण्यातही नवीन लॅबची निर्मिती होतेय. खाटांची संख्याही लाखांच्या आसपास आहे. ही सोपी गोष्ट नाही. करोनाशी नियोजनबद्धरित्या लढण्यासाठी आपण एक टास्क फोर्स बनवला आहे. डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची दुसरी एक टीम बनवली आहे. या दोन्ही टीम आरोग्य सेवेबाबत उत्तम मार्गदर्शन करत आहेत,' असं प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post