कट्ट्याचा धाक दाखवून व्यापार्‍यास सव्वाचार लाखास लुटले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असून शहर व उपनगरात लुटमारीच्या घटनाही वाढल्या आहेत. व्यापारी वैभव मूलचंद शेटिया यांना दुचाकीवरुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी सोमवारी (दि.22) रात्री सव्वा आठ वाजल्याच्या सुमारास गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे सव्वाचार लाख रुपयांची रोकड बळजबरीने चोरुन नेल्याची घटना नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील नागापूर येथील चेतना कॉलनी येथे घडली. या मारहाणीत वैभव शेटिया जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला 15 टाके पडले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथील चेतना कॉलनी येथे माजी नगरसेवक विपुल शेटिया यांचे बंधू वैभव मुळचंद शेटीया (वय 44, रा.माणिकनगर) यांचे नगर-मनमाड रोडवरील दूध डेअरी चौकात वैभव सेल्स कॉर्पोरेशन नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वैभव शेटीया हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी शेटीया यांना अडविले. यावेळी शेटीया यांनी त्यांच्याकडील बॅग कारमध्ये ठेवली असता तिघांनी बॅग घेण्याचा प्रयत्न करीत शेटीया यांना मारहाण केली आणि त्यांना गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवून कारमधील बॅग आतील 4 लाख 22 हजार 300 रुपयाच्या रोख रकमेसह बळजबरीने चोरुन नेली. मारहाणीत वैभव शेटीया हे जखमी झाल्याने नागरिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात औषधोपचाराकरीता दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली असता त्यांना राऊंडसह मॅगझिन सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. आजूबाजूच्या दुकानात व इतर ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही कॅमर्‍यांचे फुटेज पोलिस तपासत आहेत.

रुग्णालयात त्यांच्या प्राथमिक उपचार केले असता त्यांच्या डोक्याला व कपाळावर एकूण 15 टाके पडले. रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ.सागर बोरुडे यांनी सांगितले. वैभव शेटीया हे माजी नगरसेवक विपुल शेटिया यांचे बंधू आहेत.

या प्रकरणी वैभव शेटीया यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 397, 3/25, 4/25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधोर हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post