भाजपाचे जिल्हा बँकेसमोर आंदोलन



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- पावसाळा सुरू होऊनही राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 23) दुपारी निदर्शने करण्यात आली.

जिल्हा बँकेचे संचालक माजी आ. शिवाजीराव कर्डिले व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, माजी तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, शामराव पिंपळे, दादा बोठे, गणेश भालसिंग, बाळासाहेब महाडिक, संजय पाटील, अॅड. श्रीराज डेरे, गणेश जायभाय, महेश लांडगे, अशोक पवार, परसराम बोरुडे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, राज्य सरकारने पावसाळा सुरू झाला तरी शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठीचे कर्जवाटप सुरू केलेले नाही. तसेच राज्यात कोरोनाचे संकट असले तरी खरीप हंगाम व शेतीची कामे थांबलेली नाहीत. जिल्ह्यात हजारोंच्या वर शेतकर्‍यांचा हरभरा, मूग, सोयाबीन घरातच पडून आहे. पर्याय नसल्याने व्यापार्‍यांना कमी भावात तो विकावा लागत आहे. यापूर्वीच्या शेतीमालाला बाजार नाही आणि खरीप हंगामासाठीचे पीक कर्ज मिळत नाही. कापसाचे, तुरीचे, हरभर्‍याचे पैसे अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे खरीप हंगामासाठीच्या बियाणांचा खते व मजुरीचा खर्च भागवायचा कसा, असा मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज मंजूर करून ते त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post