शहरातील अनेक घरांमध्ये घुसले पावसाचे पाणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने गुरुवारी (दि. 25) रात्री नगर शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली. या पावसाने शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसल. सुमारे 200 घरांमध्ये गुडघाभर पाणी भरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. किराणा, धान्यासह संसारोपयोगी वस्तू या पाण्यात भिजल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिक रात्रभर घरांमधील पाण्यात जागे असताना महापालिकेची यंत्रणा मात्र गाढ झोपेत होती. अखेर शुक्रवारी सकाळी 9 वा. महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

ढगांच्या गडगडाटासह पावसाने गुरुवारी रात्र शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहर परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. बोल्हेगाव फाटा येथील गणेश चौक परिसरातील कॉलनीमधील घरांमध्ये पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात झाली. पाहता-पाहता जवळपास 200 घरांमध्ये मोठी तारांबळ उडाली. घरातील संसारोपयोगी वस्तू पाण्यापासून वाचवताना नागरिकांची पुरती दमछाक झाली. घरातील टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रीक वस्तू, गॅस टाक्या, किराणा, धान्य, वाहने सर्वकाही पाण्यात बुडाले. घरातील लहान मुले, वृद्ध नागरिक यांचे मोठे हाल झाले. घरातील पाण्यात जीव मुठीत धरून नागरिकांनी रात्र जागून काढली.

नियोजनशून्य कारभाराचा फटका

बोल्हेगाव फाटा ते गणेश चौकापर्यंत काँक्रीटच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. हा रस्ता उंचावर असून काम पूर्ण करताना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये भरत आहे. रस्त्यालगतच्या सर्वच घरांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पावसात गोरगरीब नागरिकांचे संसार पाण्यात गेले आहे.

विशेष म्हणजे घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणेशी संपर्क साधला परंतु कोणताही अधिकारी कर्मचारी रात्रभर या परिसराकडे फिरकला नाही.

नगरसेवकांनी केली पाहणी

नगरसेवक कुमार वाकळे आणि दत्ता सप्रे यांनी शुक्रवारी सकाळी बोल्हेगाव फाटा परिसरात येऊन पाहणी केली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन यंत्रणेशी संपर्क साधला परंतु त्यानंतरही यंत्रणा येता-येता 9 वाजले. तोपर्यंत नागरिकांना ताटकळत रहावे लागले. घरात बसायलाही जागा नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. महापालिकेने या परिसरातील पाणी वाहून जाण्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक वाकळे व सप्रे यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post