केंद्राकडे आता राज्याची 'ही' मागणी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स सेवा देण्यासाठी मुंबईत येणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्राला दिली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याचेही टोपेंनी नमूद केले.
राज्यामध्ये करोना संसर्गाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला. यावेळी टोपे यांनी तपशीलवार माहिती दिली.
राज्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्के
राज्याचा करोनाचे रुग्ण बरे होण्याचा प्रमाण जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी भागात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल्स, सेंट जॉर्ज रुग्णालयात आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले
कंटेनमेंट झोनसाठीचे निकष बदलावे
केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष तयार केले आहेत त्यात बदल करण्याची मागणी टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलिस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनच्या ड्युटीवर आहेत. त्यांना आराम मिळावा वा हे पोलीस बळ अन्यत्र वापरता यावे यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा व त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्या, अशी मागणी टोपे यांनी केली.
Post a Comment