करोना 400 च्या टप्प्याजवळ


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा बघता बघता 400 च्या टप्प्याजवळ आला आहे. शनिवारी जिल्ह्यात आणखी 16 करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यामुळे बाधितांचा आकडा 397 झाला आहे. काल बाधित आलेल्या रुग्णामध्ये सर्वाधिक 7 रुग्ण हे एकट्या नगर शहरातील असून यामुळे शहरातील करोनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात करोना ऑक्टिव्ह केसेस 111 झाल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयातील करोना तपासणी प्रयोग शाळेतून शनिवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 15 रुग्ण करोना बाधित आढळून आले. यात नगर शहरातील सात रुग्णांचा समावेश असून नालेगावातील तीन पॉझिटिव्हसह, आडते बाजार, सुडके मळा आणि तारकपूर भागात नव्याने प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत. दाट लोकवस्ती असणार्‍या तोफखाना भागात आणखी एक करोना रुग्ण समोर आला आहे.

तारकपूर येथील रुग्ण हा भोपाळ येथून प्रवास करून आला होता. श्रीगोंदा तालुक्यातील करोना बाधितांची संख्या हळूहळू वाढत असून शनिवारी आणखी तीन बाधित सापडले आहेत. यासह कोपरगाव, श्रीरामपूर आणि पारनेर तालुका प्रत्येकी एक आणि राहाता तालुक्यात 2 करोना बाधित आढळले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील बाधित आढळलेल्या व्यक्ती भिवंडी येथून प्रवास करून आल्या होत्या, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 111 झाली असून एकूण रुग्ण संख्या 397 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13 व्यक्तींचा करोनाने बळी घेतलेला आहे.

आणखी आठ करोनामुक्त
शनिवारी जिल्ह्यातील आणखी आठ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यात संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 273 झाली आहे.

अशा आहेत ऑक्टिव्ह केसेस
बुथ हॉस्पिटल 68, जिल्हा रुग्णालय 8, जिल्हा रुग्णालय अतिदक्षता विभाग 9, लोणी 2, संगमनेर ग्रामीण रुग्णालय 11, संजीवनी हॉस्पिटल संगमनेर 4, श्रीगोंदा समाज कल्याण वसतिगृह 6,आंनदऋषीजी हॉस्पिटल आणि पारनेरच्या एका खासगी रुग्णालयात प्रत्येकी एक असे 110 असे रुग्ण आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post