या कारवाईला विखे-कर्डिले वादाचे स्वरूप : खा. विखेमाय अहमदनगर वेब टीम
राहुरी फॅक्टरी - राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्यास थकबाकी प्रकरणी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडून नोटीस मिळाली असून ही नोटीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे अपेक्षित आहे. मात्र, या कारवाईला विखे-कर्डिले वादाचे स्वरूप काही लोकांनी दिल्यामुळे सहकारात काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर विपीरत परिणाम होत आहे. कारखाना चालू करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळाच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि सहकारात काम करणार्‍या कार्यकर्त्यांची खिल्ली उडविल्यासारखे आहे, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची ही अवस्था एका दिवसात झाली का? एकेकाळी कारखान्याची गणना अतिशय संपन्न अशा संस्थांमध्ये होत होती. आजची दुरवस्था, थकीत कर्ज फेडण्यासाठी मालमत्तांची विक्री, इतर पूरक प्रकल्प बंद पडणे कोणाच्या काळात झाले? याचा विसर सभासदांना पडलेला नाही. तत्कालीन सत्ताधार्‍यांनी सहकारी संस्थांचे वाटोळे करून नंतर स्वतःच्या मालकीचा कारखाना काढला.

मात्र, त्यांना कोणी जाब विचारायला तयार नाही. शेतकरी, सभासद आणि कामगार हित लक्षात घेऊन परिवर्तन मंडळाने सत्तेवर येताच थकित एफआरपी दिली, कामगारांचे अंशतः देणी दिली आणि दोन वर्ष यशस्वीपणे गळीत हंगाम पूर्ण केला. दुष्काळामुळे, उसाच्या अनुपलब्धतेमुळे कारखाना सुरू करता आला नाही व जिल्हा सहकारी बँकेला हप्ते न देता आल्यामुळे आरबीआयच्या निकषाप्रमाणे थकबाकीसाठी बँकेने कारखान्यास नोटीस दिली.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखाना सुरू होऊ शकला, याबद्दल कुणालाच शंका नसावी. त्यामुळे एकीकडे बंद पडलेला, अवसायानात निघू शकणारा शेतकर्‍यांच्या मालकीचा कारखाना वाचविण्यासाठी धडपडणार्‍या माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळास जाब विचारणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे आहे. असे खा. डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा सहकारी बँकेच्या कारवाईला विखे- कर्डिले वादाचे स्वरूप देऊ नये. सभासद व कामगारांच्या हितासाठी विखे व कर्डिले दोघेही कटिबद्ध आहेत. जिल्हा सहकारी बँकेची ही कारवाई नियमाप्रमाणे असल्याने आरबीआयच्या नियमांना अधीन राहून शेतकर्‍यांच्या हितासाठी बँक सकारात्मक निर्णय घेईल, अशी मला खात्री आहे व त्यासाठी संचालक मंडळाने बँकेकडे मुदतीसाठी अर्ज सुद्धा केले आहेत, अशी माहिती खा. डॉ. विखे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post