करोनामुळे शिक्षण विभाग पेचात : नगर शहरातील परिस्थिती गंभीर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शालेय शिक्षण विभागाने यंदा करोना संसर्गामुळे टप्प्याटप्प्याने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक जुलैपासून 9 वी, 10 वी आणि बारावीचे वर्ग भरविण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची संमती घेण्यात येत असून जिल्ह्यात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील शाळा एक जुलैपासून सुरू कराव्यात की नाही, या संभ्रमात खुद्द शिक्षण विभागच आहे. दरम्यान, नगर शहरात गेल्या काही दिवसांत करोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे एक जुलैपासून 9 वी ते 12 वीपर्यंतची एकही शाळा सुरू करण्याच्या मनस्थितीत शिक्षण विभाग नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षे उशीरा आणि टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अनेक ठिकाणी करोनाचा संसर्ग वाढत असल्याने 1 जुलैपासून शाळा सुरू कराव्यात की नाही, याबाबत शिक्षण विभाग आता गोंधळले आहे. राज्यासह ही परिस्थिती जिल्ह्यात आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा जिल्ह्यातील 9 वी, 10 वी आणि 12 वीच्या शाळा सुरू कराव्यात की नाही, याबाबत शाळा पातळीवर असणार्‍या शाळा व्यवस्थापन समितीकडून ठराव मागविले आहेत. जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या 5 हजार 372 शाळा आहेत. यातील किती शाळा सुरू होऊ शकतात यासाठी जूनच्या तोेंडावर शिक्षण विभागाने घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 2 हजार 741 शाळा म्हणजे एकूण शाळांपैकी निम्म्याच शाळा सुरू होतील, अशी आकडेवारी समोर आली होती.

दरम्यान, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने नव्याने 1 जुलैपासून सुरू होणार्‍या 9 वी, 10 वी आणि 12 वीच्या शाळांबाबत माहिती मागविली आहे. ही माहिती संकलित होत असून जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी सुमारे 30 ते 40 टक्के शाळा व्यवस्थापन समितीने सुरू करण्याची मागणी केली आहे. अनेक तालुक्यांतून जोपर्यंत करोनाचा नायनाट होत नाही, तोपर्यंत शाळा भरविण्यात येऊ नयेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात संगमनेर, अकोले, राहाता आणि नगर शहरात करोनचा उद्रेक वाढत आहे. तर अन्य तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात करोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत.

अशा परिस्थितीत मागणी असली तरी शाळा सुरू कराव्यात की नाही, याबाबत शिक्षण विभागात गोंधळाचे वातावरण आहे. नगर शहरात गेल्या काही दिवसांत काही विशिष्ट भागात सामूहिक करोना रुग्ण समोर येत आहेत. यामुळे शिक्षण विभाागने कोणत्याही परिस्थितीत शहरातील 9 वी, 10 वी आणि 12 वीच्या शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरवर्षी जिल्ह्यात 15 जूनला शाळा सुरू झाल्यातरी 15 जुलैच्या जवळपास खर्‍याअर्थाने शैक्षणिक कामकाजाला सुरूवात होते. त्यानंतर शैक्षणिक वर्षात पावसाळी क्रीडा स्पर्धा, हिवाळी क्रीडा स्पर्धा, दिवाळी आणि नाताळच्या दीर्घ सुट्ट्या, शैक्षणिक सहली, स्नेहसंमेलन आणि अन्य बाबी यांचा सुट्ट्यांचा कालावधी हा दीड ते दोन महिने होतो. यामुळे यंदा उशीरा शाळा सुरू झाल्यातरी अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. यासह शैक्षणिक वर्षातील रविवारच्या अन्य शासकीय आणि सणावारांच्या सुट्ट्यांचा वापर देखील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो, यामुळे पालकांनी विनाकारण गडबड करू नये, असे शिक्षण विभागातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post