गोदावरीत 2421 क्युसेकने विसर्गमाय अहमदनगर वेब टीम
अस्तगाव - सह्यद्रिच्या घाटमाथ्यावर गेल्या 10-12 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दारणा, गंगापूर धरणांमध्ये नविन पाण्याची आवक थांबली आहे. काल दिवसभरात नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटात निफाड, पिंपळगाव बसवंत आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नविन पाण्याची आवक होऊ लागल्याने या बंधार्‍यातून गोदावरीत काल सायंकाळी 6 वाजता 2421 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता.

दारणा धरणांच्या पाणलोटात पाऊस थांबला असला तरी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात मात्र पावसाने दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत राहाता येथे 60, रांजणगाव येथे 36, चितळीला 11, देवगाव 20, ब्राम्हणगाव 26, कोपरगाव 3, कोळगाव 8, सोनेवाडी 21, शिर्डी 40 मिमी असा पाऊस नोंदला गेला. नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातील निफाड, पिंपळगाव बसवंत तसेच नाशिकलाही पावसाने दमदार हजेरी लावली.

काल सकाळी निफाड, पिंपळगाव बसवंत येथे चांगला पाउस झाला. या पावसाचे पाणी नांदूरमधमेश्वरमध्ये येण्यास सुरुवात झाल्याने काल सकाळी 9 वाजता सुरुवातीला गोदावरीत 202 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. ते दुपारी 3 वाजता 807 इतके करण्यात आले. चार पर्यंत हा विसर्ग टिकून होता. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता 2421 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधारा 100 टक्के भरला आहे. या बंधार्‍यातून आज शनिवारी सकाळपर्यंत विसर्ग नदीत सुरू असेल. नंतर तो बंद होईल. या बंधार्‍यातून गोदावरीचा उजवा कालवा 350 ने तर डावा कालवा 125 क्युसेकने सुरू आहे. 30 जूनपर्यंत हे कालवे सुरू राहतील. त्यानंतर ते बंद होतील. 1 जुलैपासून खरीप हंगाम सुरू होतो.

काल सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गंगापूर धरणाच्या भिंतीजवळ 5 मिमी पावसाची नोंद झाली. काश्यपीला 22, गौतमी गोदावरीला 28, अंबोलीला 2 मिमी पावसाची नोंद झाली. तर दारणाच्या पाणलोटात किरकोळ बुरबूर होती. मात्र काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 23, तर भावलीला 27 मिमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणातून गोदावरी कालव्यांसाठी विसर्ग सुरू होता. 650 ने सुरू असलेला विसर्ग काल सायंकाळी 5 वाजता दिडशेने कमी करुन 500 वर आणण्यात आला. नंतर तासाभरात हा विसर्ग बंद करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post