मोदींनी जाहीर केलेले पॅकेज हे नेहमीचाच 'जुमला



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख कोटी रुपयांच्या कोविड पॅकेजचा तपशील जाहीर झाल्यावर हे खऱ्या अर्थाने प्रोत्साहन पॅकेज नसून नेहमीसारखा ‘जुमलाच’ आहे हे स्पष्ट झाले. या वेळचा जुमला ‘आत्मनिर्भर’ आहे. मोदींनी आत्मनिर्भरतेचा शोध लावल्याचा आविर्भाव करणे दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
चव्हाण यांनी आज पॅकेजबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणले की, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. लोकांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांची क्रयशक्ती संपली आहे. बाजारपेठेत मागणी नष्ट झाली आहे. त्यामुळे पुरवठादारांच्या किंवा उद्योगांच्या मालाची विक्री होणे अवघड होणार आहे. जागतिक अर्थतज्ञांनी भारतामध्ये गंभीर आर्थिक मंदीचे भाकीत वर्तवले आहे. त्यांनी मागणी वाढावी यासाठी सरकारने चौकटीबाहेर जाऊन खर्च करणे गरजेचे आहे.
१२ मे रोजी प्रधानमंत्र्यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. त्याच वेळी मी स्वागत केले. पण अर्थमंत्र्यांच्या ५ प्रदीर्घ पत्रकार परिषदेत या योजनेचा तपशील जाहीर झाला आणि देशाची घोर निराशा झाली. पॅकेजमध्ये रोख मदतीची तरतूद नाही. त्यात फक्त कर्जाचे आवाहन आहे. त्यामुळे कोणत्याही घटकाला थेट व त्वरित दिलासा मिळण्याची शक्यता नाही. सरकार निश्चित प्रत्यक्ष किती खर्च करणार हे कुणालाही निश्चित सांगता येत नाही. जवळपास १२ जागतिक वित्तीय संस्थादेखील या पॅकेजमधील थेट खर्चाचा निश्चित आकडा सांगू शकल्या नाहीत.
मोदींच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये २० लाख कोटींपैकी फक्त २ लाख कोटी रुपये थेट खर्च होणार आहे, तर सुमारे १८ ते १९ लाख कोटी रुपयांचे हे कर्ज घेण्याचा सल्ला आहे किंवा विविध क्षेत्रात पुढील पाच वर्षांत पैसे खर्च करण्याची पंचवार्षिक योजना आहे. बँकांना विनातारण कर्ज देण्याची सक्ती करण्याचा उपाय शोधला आहे, पण त्याला रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे का? विनातारण कर्ज म्हणजे बँकिंग सिद्धांताच्या मुळावर घाव आहे. सध्याच्या परिस्थितीत विनातारण कर्जाची परतफेड होणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post