साईबाबा संस्थानच्या कर्मचार्‍यांची 40 टक्के वेतन कपात




माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी - साईबाबा संस्थानमध्ये काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना ठेकेदाराकडून मागील महिन्याचे पगार न दिल्याने या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून या कामगारांचे शोषण होत आहेे. समान काम-समान वेतन या न्यायाने कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांप्रमाणेच वेतन द्यावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना देखील लॉकडाऊनमध्ये पगार कपातीची टांगती तलवार आहे.

कायम कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर झाले मात्र आज दुसर्‍या महिन्याची 21 तारीख उलटून गेली आहे. तरीसुद्धा अद्यापही पगार करण्यात आले नाहीत. साईबाबा संस्थानवर त्रिसदस्यीय समिती नेमली असताना प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य कर्मचार्‍यांना पडला आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत चाळीस टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कंत्राटी कर्मचार्‍यांवर आसमानी आर्थिक संकट कोसळले आहे.

साईबाबा संस्थानमध्ये साधारणपणे चार हजार कंत्राटी कामगार काम करतात. लॉकडाऊन जाहीर करून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. करोनाचा सामना करण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत असून राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडला आहे. दरम्यान संस्थान प्रशासनाने या कामगारांचे चाळीस टक्के वेतन कपात करण्याचे परिपत्रक काढले होते.

याविषयी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरचे वेतन कपात करू नये, अशी मागणी केली आहे. मात्र प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत तेरा नियमावली असलेले परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये एप्रिल महिन्यातील पगारातून चाळीस टक्के पगार कपातीचा निर्णय झाल्याचे वृत्त समजले आहे. तर मे महिन्याच्या पगाराबाबत माहे जुनमध्ये परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद आहे. देशभरातील सरकारी, शासकीय, निमशासकीय व खासगी ठिकाणी काम करणार्‍या सर्व प्रकारच्या कंत्राटी कामगारांना समान काम-समान वेतन धोरणाप्रमाणे लाभ द्यावा असे आदेश असताना चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या वेतनात चाळीस टक्के कपात करण्याचे आदेश त्रिसदस्यीय समितीच्यासमोर ठेवण्यात आले आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

साईबाबा संस्थानच्यामार्फत ठेकेदाराकडून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या कामगारांना पगार देण्यास टाळाटाळ होत आहे. मागील एप्रिल महिन्याचा सुमारे हजारो कंत्राटी कामगारांना पगार अद्यापही दिला नसल्याचे कंत्राटी कर्मचार्‍यांनी सांगितले आहे. यातील अनेक कामगार हे गेल्या विस ते पंचवीस वर्षांपासून संस्थानच्या विविध विभागात कार्यरत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून रखडलेला पगार तातडीने देण्यात यावा, जेणेकरून कुट़ुंबाची होणारी उपासमार टळेल तसेच दर महिन्याला नियमित वेळेत पगार द्यावा, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

साईबाबा संस्थानच्या विविध विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना संस्थानने बोलावूनही हे फेबु्रवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीत सलग कामावर गैरहजर असतील त्यांना माहे एप्रिल 2020 चे वेतन देण्यात येऊ नये, असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post