अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक रुग्ण कोरोना बाधित
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरगाव येथील ती व्यकी राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता हे संकट जास्त वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कायद्याचे पालन करावे, असे ते म्हणाले.

कोपरगाव येथील बाधित महिलेला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिला तपासणीसाठी कोपरगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. तिच्या घशातील स्त्राव नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. आज अहवाल प्राप्त झाला त्यात ही महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. मात्र, ही महिला अद्याप कोणत्याही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झालेले नाही तसेच या महिलेने, तिने कुठेही प्रवास केला नसल्याची माहिती दिली आहे. ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती, याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून घेतली जात आहे.


दरम्यान, आज अखेरपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने १०१४ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील २५ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. या २५ बाधिताशिवाय एक जण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील आहे. दुसरा बाधित रुग्ण हा मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील असून तो पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. एकूण ९२० जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. अद्याप ६२ स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. ०७ स्त्राव अहवाल प्रयोगशाळेने नाकारले आहेत. जिल्हा रुग्णालयात १५९ जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ५९३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post