लॉकडाऊन काळात नागरिकांनी सहकार्य केले तरच परिस्थिती बदलेल


सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळा; घराबाहेर पडू नका ।
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये. सार्वजनिक संपर्क टाळावा. सर्व नागरिकांनी हे नियम पाळले, तर ही परिस्थिती बदलेल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 25 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील एक युवक हा पुणे येथे ससून हॉस्पिटल येथे आयसोलेशन कक्षात भरती असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्या घशातील स्त्रावही तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत म्याकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील आतापर्यंत ७६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी जिल्हा सामान्य रुग्णालयातून पाठविलेल्या पैकी २४ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले तर श्रीरा्मपूर येथील युवकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तो पुणे येथील ससून रुग्णालयात भरती आहे. बाधित रुग्णांपैकी ११ जण नगर (परदेशी रुग्णांसह), जामखेड ०६ (परदेशी रुग्णासह), संगमनेर ०४, राहाता-०१, नेवासा- ०२ आणि श्रीरामपूर ०१येथील आहेत. या बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. काल रात्रीपर्यंत ८४ व्यक्तींचे घशातील स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तर ६१ व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आले असून ते आज पाठविण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा यंत्रणेने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, कोरोनाची संख्या वाढली तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे सध्या औषधी साठा आहे. जास्त संख्येने पीपीई कीट मिळण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणे झाल्याचे ते म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने जिल्हा बंदी जाहीर केली. त्यामुळे बाहेरील स्थलांतरित, मजूर यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. प्रशासनाने आणि खासगी आस्थापनांनी सुरु केलेल्या २९ निवारा केंद्रातून २ हजार नागरिकांची व्यवस्था केली असून तेथे त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच. नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी होत असल्याचेही ते म्हणाले. त्यांना मानसिक आधार दिला जात असल्याचेही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post