दोघा भावांनी घर बसल्या बनवले व्हेंटिलेटर


सिसोदिया बंधुंचा अनोखा उपक्रम ः आ. संग्राम जगताप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- आज संपूर्ण जग कोरोना या संसर्ग विषाणूशी लढत आहे. या विषाणूमुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मानवी जीवनावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी प्रशांत सिसोदिया, विशाल सिसोदिया या दोन्ही भावांनी इंटरनेटचा उपयोग करुन घर बसल्या व्हेंटिलेटर तयार करण्याचे काम केले आहे. या लॉकडाऊनचा उपयोग चांगल्या कामासाठी करत आहे. या विषाणूवर मेडिकल सुविधाही कमी पडत आहे. या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करुन समाजाच्या उपयोगी पडण्याचे काम या दोन्ही बंधूंनी करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
लॉकडाऊनच्या काळामध्ये विशाल सिसोदिया व प्रशांत सिसोदिया यांनी घरबसल्या व्हेंटिलेटर मशीन इंटरनेटच्या मदतीने तयार करुन जिल्हा रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना प्रात्यक्षिक दाखवून व्हेंटिलेटर मशीन सिव्हिल हॉस्पिटलला मोफत देण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप, भूपेंद्र परदेशी, चंदन पवार, अर्जुन मदन, नितेश सिसोदिया आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मुरंबीकर म्हणाले की, कोरोना या आजारामुळे देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग या सिसोदिया बंधुंनी एका चांगल्या कामासाठी केला आहे. जी गोष्ट आपल्यासमोर आली आहे, तिचा उपयोग नक्कीच कोरोना रुग्णांसाठी होणार आहे. कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजन घेण्याची गरज असते. ती बाब इलेक्ट्रिकमधून सिसोदिया बंधुंनी पुढे आणली, ही एक जमेची बाजू असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विशाल सिसोदिया म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात व्हेंटिलेटर मशीन बनविण्याची संकल्पना पुढे आली. यामुळे आम्ही घरात असलेल्या साहित्यातून व्हेंटिलेटर मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अबू बॅग कीट, सिरींज स्पोक, क्रँक व्हील, रेग्युलेटर सर्किट, गीयर बॉक्स, स्कू, मोटार, स्पीड रेग्युलेटर, सर्क्रिट अ‍ॅण्ड स्विच, पॉवर ऑन-ऑफ स्वीच, एलईडी वायर, डी.सी. पावर सर्किट, कुलींग फॅन, मास्क एक्सरेन पाईप आदी साहित्याच्या माध्यमातून ही मशीन तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सामाजिक भावनेतून हे मशीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुपूर्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post