'ते' वक्तव्य राष्ट्रवादीला उद्देशून : मुनगंटीवार



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलत असताना शिवसेनेला फसवले ही चूक झाली हे माझे वक्तव्य राष्ट्रवादीने शिवसेनेला फसवू नये, अशा अर्थाचे होते. परंतु त्याचा विपर्यास करण्यात आला. भारतीय जनता पक्ष राजकारणात विशिष्ट मूल्ये घेऊन काम करतो, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा पक्ष असून शिवसेना आणि आमची अनेक वर्षांची युती होती आणि मित्रपक्षाला फसवण्याची आमची वृत्ती नाही, असे स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिले.

ज्या शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळाले त्या शिवसेनेने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतुदी केल्या गेल्याच नाहीत. एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवलेच आहे, असे मी म्हणालो. त्या वेळी समोरच्या बाकावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपने चूक केली म्हणून शिवसेना आमच्याकडे आली, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना मी उपहासात्मक उत्तर दिले. अकाली दलासारख्या पक्षाबरोबर आमची ४०-५० वर्षांपासूनची युती आहे. शिवसेनेबरोबरही ३० वर्षे आमची मैत्री होती. मित्रपक्षाला फसवण्याचे काम आमच्या हातून कधीच झालेले नाही आणि भविष्यातही होणार नाही. माझ्या वक्तव्याचा कृपा करून चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. असेही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post