अहमदनगरमध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लूट


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांना आधार केवायसी केल्याशिवाय कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही.

जेऊर गाव व परिसरात केवायसी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची सर्रास पणे लूट सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडून केवायसी करण्याकरता शंभर ते दोनशे रुपये फी आकारली जात आहे. शासनाकडून प्रति केवायसी साठी सेवा केंद्र वाल्यांना बारा रुपये शुल्क मिळणार आहे. त्यामुळे कर्जमुक्ती झालेल्या लाभार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता केवायसी करून देण्याचे शासनाचे आदेश असताना जेऊर गाव तसेच इमामपूर, पांगरमल, खोसपुरी व इतर गावांनी शेतक-यांकडून केवायसी साठी १०० ते २०० रुपये उकळण्यात येत आहेत. जेऊर सेवा केंद्रात बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी येथिल शेतकरी केवायसी साठी येत आहेत.

आधार प्रमाणीकरण हे नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रा कडून केले जात आहे. जेऊर मधील सेवा केंद्रामध्ये केवायसी साठी शेतकऱ्यांची गर्दी होत असून त्याचा फायदा सेवा केंद्र चालक उठवत असल्याचे दिसून येत आहे. केवायसी च्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. तरी शासनाचा आदेश असताना शेतक-यांकडुन पैसे उकळणा-या सेवा केंद्र चालकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

सेवा केंद्र चालकांवर कारवाई गरजेची
शासनाचा आदेश डावलुन शेतक-यांची आर्थिक लुट करणा-या सेवा केंद्र चालकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
-उपसरपंच बंडु पवार, जेऊर

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post