जेऊरमध्ये मर्डर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुक्यातील जेऊर येथे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात इसमाचा खुन करून मृतदेह नगर-औरंगाबाद महामार्गाच्या कडेला टाकून देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शुक्रवार दि.५ रोजी सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांनी मृतदेह पाहून घटनेबाबत पोलिस स्टेशनला खबर दिली. सदर इसमाला जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्याचे दोन्ही पाय तारेने बांधून ठेवण्यात आले होते. टोल नाक्या शेजारील राधाई हॉटेल समोर हा प्रकार घडला. त्याचा खून इतरत्र करून मृतदेह जेऊर परिसरात आणून टाकल्याची शंका उपस्थित होत आहे. खून झालेला इसम २५ ते ३० वयोगटातील असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
खुन झालेल्या इसमाच्या खिशामध्ये झारखंड ते पुणे या प्रवासाचे रेल्वे तिकीट आढळून आले. पोलिसांना आता सर्व तपास रेल्वे तिकिटाच्या आधारेच करावा लागणार आहे. खुनाचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घटनास्थळी पोलीस उप अधिक्षक अजित पाटील यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यू कशाने झाला याची निश्चित माहिती मिळणार आहे. अधिक तपासासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आलेली आहेत.
Post a Comment