लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी लक्झरी बस झाली पलटी




माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - औरंगाबाद येथील लग्नाचे वऱ्हाड घेवून नांदुऱ्याला जाणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे लक्झरी बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून जवळपास 26 वऱ्हाडी जखमी झाले आहेत. आज (8 मार्च) रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास चिखली जालना महामार्गावरील अंचरवाडी फाटयावरील वळणावर घडली. अपघातातील जखमींना तातडीने देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
औरंगाबाद येथून 26 ते 27 वऱ्हाडी मंडळींना घेवून (एम.एच. 15/ ईएफ/0714) या क्रमांकाची लक्झरी बस ही नांदुऱ्याकडे जात होती. दरम्यान समोरून (एम.एच.28/ बी / 8038) पाण्याचा टॅंकर येत होता. अंचरवाडी फाट्यावरील वळणावर येताच समोरील टॅंकरला हुल देण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि लक्झरी बस रस्त्यावरच पलटी झाली. अपघात घडताच लक्झरी मधील वऱ्हाडींनी आरडओरडा करण्यास सुरूवात केली. यावेळी रस्त्याने येणाऱ्या - जाणाऱ्या नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघातात नयना नंदकुमार कुळकर्णी (वय 46 रा. औरंगाबाद) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जवळपास 26 वऱ्हाडी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी नरेंद्र ठाकरे, झीने, संदिप पाटील, उगले, सैय्यद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून जखमींना देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. यावेळी रुग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी हजर असल्याने व रुग्णांची संख्या जास्त असल्याने देऊळगाव मही येथील डॉ बोर्डे, डॉ महेश दंदाले, डॉ अरुण सोनसळे, डॉ रमाकांत सपकाळ, डॉ विजय खेडेकर, डॉ. भारत टेकाळे, डॉ किशोर शिंदे, डॉ सचिन सोनसळे, कैलास उगले, दिपक वायाळ यांनी रुग्णालयात धाव घेवून रुग्णावर उपचार केले.
जखमींमध्ये आकाश तेलंग (वय 22), कस्तुरा तराळे (वय 70), निखील तराळे (वय २५), मोतीराम इंगळे (वय 75), सुशिला तराळे (वय 75) सरस्वती इंगळे (वय 15), अरुण लोखंडे (वय ६८), निनाद चिखलीकर (वय 30), सुष्टी इंगळे (वय 9), रेणु तराळे (वय ४०), सुनंदा गुजारे (वय 55), मेघा गावंडे, सायली मतमने (वय 12), सरवरी इंगळे (वय 14), ज्ञानेश्वर तराळे (वय 45), लिलाबाई इंगळे (वय 66) विनायक आरमाळ (वय 38), नंदा दळवी (वय 67), कल्पना अरबट (वय 47), जयश्री तराळे, गजराबाई जायभाये (वय 55), बाजीराव जायभाये (वय 58), जगन बनसोडे (वय 36) यासह इतर जखमींचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post