जिल्हा परिषद स्थायी सभेत संबंधितांना इशारा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जिल्ह्यातील बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. वसुली तात्काळ करा अन्यथा संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ११ मार्च रोजी स्थायी समितीची बैठक पार पडली.
विविध पाणी योजना व कोरोना व्हायरस या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मिरी तिसगाव, बुऱ्हानगर व इतर गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक आहे. ही वसुली गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तात्काळ करून संबंधित ठिकाणी वॉटर मीटर बसविण्याची जबाबदारी उप अभियंता व गटविकास अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली. दरम्यान पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली न झाल्यास संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक, उपअभियंता व गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाईच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी उपाध्यक्ष प्रताप शेळके,अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख, बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते, महिला व बालकल्याण सभापती मीराताई शेटे, सदस्य संदेश कार्ले,अनिल कराळे, सदाशिव पाचपुते, अनिता हराळ, महेश सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभेचे सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आदींसह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
Post a Comment