नगर बाजार समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची १३ मार्चला निवड


सभापती विलासराव शिंदे, उपसभापती रेश्मा चोभे यांचे राजीनामे मंजूर

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - माजी खासदार (कै.) दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे व उपसभापती रेश्मा रेवणनाथ चोभे यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार असून येत्या १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

बाजार समितीचे सभापती शिंदे यांचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला होता, तर उपसभापती चोभे यांचा राजीनामा समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. हे राजीनामे मंजूर करण्यात आल्यानंतर समितीने नूतन पदाधिकारी निवडीसाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविला होता. बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक सन २०१६ मध्ये झाली होती. या निवडणुकीत सत्ताधारी कर्डिले-कोतकर जगताप गटाने महाआघाडी पुरस्कृत मंडळाचा पराभव करीत सर्व १७ जागा जिंकत समितीवर तिसऱ्यांदा वर्चस्व मिळविले होते.

या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी समितीच्या सभापती व उपसभापतिपदी रोटेशन पद्धतीने दरवर्षी संचालकांना संधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या वर्षी सभापतीपदी विलासराव शिंदे यांची, तर उपसभापतीपदी रेश्मा रेवणनाथ चोभे यांना संधी देण्यात आली. संचालकांमधून बदलाची मागणी करण्यात आल्यानंतर एक वर्षांपूर्वी कर्डिले यांनी दोघांचेही राजीनामे घेतले. मात्र, शिंदे व चोभे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. आता समितीच्या निवडणुकीसाठी पावणे दोन वर्षांचा कालावधी राहिला असल्याने संचालकांमध्ये नाराजी नको, म्हणून शिंदे व चोभे यांनी श्रेष्ठींच्या सांगण्यावरून राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी येत्या १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे


अभिलाष घिगे व संतोष म्हस्के यांची नावे आघाडीवर
दरम्यान, सभापती व उपसभापतिपदी आपलीच वर्णी लागावी. यासाठी इच्छुक संचालकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सभापतीपदासाठी अभिलाष घिगे, हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग व संतोष म्हस्के यांची, तर उपसभापतीपदासाठी बाळासाहेब निमसे, बाबासाहेब खर्से, कराळे, व संतोष कुलट यांची नावे चर्चेत आहेत. यातील हरिभाऊ कर्डिले यांना या पूर्वी ५ वर्षे सभापतीपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे अभिलाष घिगे व संतोष म्हस्के यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. श्रेष्ठी कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post