कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एमआयडीसीतील कंपन्या काही दिवस बंद ठेवाव्यात - डॉ. दिलीप पवार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर एमआयडीसीतील विविध कंपन्या काही दिवस बंद ठेवाव्यात, अशी मागणी पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार यांनी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन घेत असलेल्या काळजी व करत असलेल्या उपाययोजना निश्‍चितच चांगल्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक काळजी घेण्यासाठी नगर शहरालगत असणार्‍या एमआयडीसी मधील विविध कंपन्या काही काळ बंद ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी शहरांमधून मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच नागरिकांचे येणेजाणे सुरू असते. त्याचबरोबर परराज्यातील वाहतूक तसेच कामगारही एमआयडीसीत येत असतात. ग्रामीण भागातून विविध कंपन्यांमध्ये कामासाठी येणार्‍या कामगारांची संख्याही मोठी आहे. अशा परिस्थितीत एखादा बाधीत रुग्ण या ठिकाणी आल्यास त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयडीसीतील गर्दी टाळण्यासाठी विविध कंपन्या काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी डॉ. दिलीप पवार यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post